रत्नागिरीत मोबाईल शॉपी फोडणाऱ्या चोरट्यांना अटक

रत्नागिरी रेल्वे स्थानकानजीक कुवारबाव येथे असलेल्या मँगोज मोबाईल शॉपी फोडून सुमारे पावणेपाच लाख रूपये किमंतीचे मोबाईल चोरून नेणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. मोबाईल शॉपीच्या भिंतीला भगदाड पाडून सुमारे 4 लाख 87 हजार 199 रुपये किंमतीचे मोबाईल, ब्लु टुथ , रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

मँगोज मोबाईल शॉपीच्या भिंतीला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी आतील मोबाईल लंपास केले. स्थानिक गुन्हे शाखेने परिसरातील बांधकाम कामगारांची चौकशी सुरु केली होती. पोलीस चौकीच्या बाजूला एका इमारतीचे काम सुरु आहे. तेथे प्लास्टर करण्यासाठी पश्चिम बंगाल येथील कामगार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यांनी तेथील 10 ते 15 कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी हारुन मुबारक हुसैन रशिद (वय 22), साहिन मोहसिन आलम शेख़ (वय 22) या दोघांना पोलीसांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. दोघांच्या स्वतंत्र चौकशीत त्यांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळयाने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय वाढला. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी आपण चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.

मोबाईल शॉपीसमोर काम करत असताना त्या दोघांनी मोबाईल शॉपी फोडण्याचा प्लॅन तयार केला होता. दोघांनी चोरलेले मोबाईल सिमेंटच्या पोत्यात भरुन ठेवले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी लपवून ठेवलेले सुमारे 4 लाख 74 हजार 149 रुपये किंमतीचे सुमारे 38 मोबाईल, ब्लु टुथ जप्त करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या