
सामना ऑनलाईन । मुंबई
काळोख्या रात्री माहीम, धारावीनंतर गोवंडीमध्ये पादचाऱ्यांच्या हातातले मोबाईल हिसकावून तिघे चोर मोटरसायकलवरून पळून जाण्यात यशस्वी ठरले. ते आणखी टार्गेट शोधत होते. पण रात्रीच्या गस्तीवर असलेल्या गोवंडी पोलिसांनी पाठलाग करून त्या मोबाईल चोरांचा डाव उधळून लावला.
पोलीस निरीक्षक शशिकांत पवार व त्यांचे पथक गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मैत्री पार्प परिसरात गस्त घालत असताना आदर्शकुमार पांडे (17) हा मुलगा त्यांच्याजवळ गेला आणि माझ्या हातातला मोबाईल हिसकावून तिघेजण होंडा स्कूटरवरून पळून गेल्याची तक्रार त्याने केली. पवार यांनी लगेच पोलीस व्हॅनमधून चोरांचा पाठलाग सुरू केला. अखेर पाजंरापोळ येथे चोरांवर पोलिसांनी झडप घातली. पण त्यावेळी एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी अमन जमिल ताडे (20) आणि जमिर मेहबूब सिद्दिकी (20) या दोघांना अटक केली. हे दोघेही तळोजाचे राहणारे आहेत. चौकशीत आरोपींनी सांगितले की, त्यांनी माहीम, धारावी येथे पादचाऱ्यांच्या हातातला मोबाईल हिसकावून पळ काढला होता. त्यानंतर गोवंडी येथे एका तरुणाला टार्गेट केले. चोरांनी गुह्यांची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. दरम्यान, आरोपींचा तिसरा साथीदार गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून तिसरा चोरटा सैफी मिर्झा साहिब बेग (22) याच्याही मुसक्या आवळल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले.



























































