शिक्षिकेच्या हत्येप्रकरणी अभिनेत्रीला अटक, बॉलीवूडमध्ये खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्लीतील बवाना भागामध्ये एका शिक्षिकेची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा गुंता पोलिसांनी सोडवला असून यांनी एका अभिनेत्रीसह एकूण तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये शिक्षिकेचा नवरा आणि अभिनेत्रीच्या मानलेल्या वडिलांचा समावेश आहे. या अभिनेत्रीच्या अटकेमुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

ज्या शिक्षिकेची हत्या करण्यात आली आहे तिचं नाव सुनीता होतं. सुनीताचं मनजीत नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. सुनीताचा सोमवारी घरापासून काही अंतरावर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या हत्येचा दिल्ली पोलिसांनी अवघ्या ४ दिवसांत उलगडा केला आहे. मयत सुनीताने लिहलेली डायरी आणि तिचा नवरा मनजित याच्या कॉल रेकॉर्डमुळे पोलीस आरोपींपर्यंत पोहचू शकले.

शशीप्रभा नावाची मॉडेल ही मॉडेलिंग विश्वात आणि बॉलीवूडमध्ये एंजल गुप्ता नावाने ओळखली जाते. तिची ओळख मॉडेलिंगची हौस असलेल्या मनजितशी झाली होती. मूळची उत्तर प्रदेशची राहणारी असलेली एंजल गुप्ता ही राजीव गुप्ता नावाच्या उद्योगपतीला स्वत:च्या वडिलांप्रमाणे मानत होती. एंजल गुप्ता आणि मनजितची गुरुग्राममध्ये भेट झाली होती, काही दिवसांतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. एंजलच्या मागे वेडापिसा झालेल्या मनजितने त्याच्या बायकोचा म्हणजेच सुनीताचा काटा काढण्याचं ठरवलं होतं. त्याच्या कटात एंजल आणि तिचे मानलेले वडील राजीव गुप्ताही सामील झाले. मनजितने भाडोत्री गुंडाकरवी सुनीताची हत्या केली.

सुनीताला तिच्या नवऱ्यावर संशय होता, तिने त्याच्या बाहेरख्यालीपणाबद्दलचा संशय डायरीत लिहून ठेवला होता. या डायरीमुळे आणि मनजितच्या कॉल रेकॉर्डमुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणं सोपं झालं.