
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘राफेल जेट’च्या खरेदीसाठी हिंदुस्थान आणि फ्रान्स यांच्यात २००८ सालात झालेल्या करारामध्ये त्या विमानांची किंमत गोपनीय राखण्याचे कोणतेही कलम नाहीच, असे सांगतानाच या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेची आणि देशाचीही दिशाभूल केली, असा आरोप काँग्रेसने आज केला.
या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी संरक्षणमंत्री ए. के. ऍन्टोनी, आनंद शर्मा आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी संयुक्तपणे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. तसेच एका पत्रकार परिषदेलाही त्यांनी संबोधित केले. राफेल खरेदीसंदर्भात फ्रान्सशी झालेल्या करारातील गोपनीयतेचे कलम हे फक्त तंत्रज्ञान आणि आयुधांची क्षमता उघड होऊ न देण्यासाठीचे आहे. विमानांच्या किमतीबाबत नव्हे, असे काँग्रेस नेत्यांनी निदर्शनास आणून दिले.
पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री या दोघांनीही ‘राफेल जेट’ची किंमत उघड करण्याच्या मुद्दय़ांवर लोकसभेत धडधडीत खोटी माहिती देण्याचा मार्ग पत्करला. त्यांनी देशाची दिशाभूल आणि फसवणूक केली आहे, असे तिघा काँग्रेस नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘राफेल जेट’ची किंमतच नाही, तर विमान निर्मितीचा अनुभव नसलेल्या एका कंपनीला या प्रकरणात भागीदार म्हणून कसे घुसडले, याचेही उत्तर मोदी सरकारला द्यावेच लागणार आहे. कारण त्या भागीदाराला कित्येक करोडचा लाभ झालेला आहे.
-ए. के. ऍन्टोनी, माजी संरक्षणमंत्री.
पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेची दिशाभूल करून हक्कभंगच केला आहे. त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याबाबत काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते लवकरच निर्णय घेतील.
-रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते, काँग्रेस.
‘राफेल जेट’ची किंमत उघड करण्यास फ्रान्सची कोणतीच हरकत नाही, असे त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगून टाकले आहे.
-आनंद शर्मा, ज्येष्ठ काँग्रेस नेते.























































