
सामना ऑनलाईन, वाराणसी
प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुर्योधन म्हटल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी एक पातळी खालती उतरत मोदींना औरंगजेब असल्याचं म्हटलंय. वाराणसी इते प्रचारसभेत बोलत असताना निरूपम यांनी ही टीका केली आहे. भाजपवाले रोज खोटं बोलतात आणि खोटा प्रचारही करतात असा आरोपही त्यांनी केला आहे.
#WATCH Sanjay Nirupam, Congress, in Varanasi: I feel that the person that people here have chosen- that Narendra Modi is actually the modern incarnation of Aurangzeb. (07.05.2019) pic.twitter.com/u6x0UsgU3D
— ANI UP (@ANINewsUP) May 8, 2019
निरूपम यांनी मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले की वाराणसीच्या लोकांनी ज्या व्यक्तिला निवडले आहे तो औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहे. कॉरीडॉरच्या नावाखाली त्यांनी शेकडो मंदिरे तोडली. विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी 550 रूपयांचे शुल्क लावले. औरंगजेब जे करू शकला नाही ते मोदी यांनी केले आहे अशी टीका निरूपम यांनी केली आहे.
प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुर्योधन म्हटले होते. त्यांच्या या विधानाबाबत निरूपम यांना विचारले असता त्यांनी प्रियंका यांचे विधान योग्यच असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींइतका अहंकार दुर्योधन आणि रावणालाही होता अशी टीका निरूपम यांनी केली आहे.
याच निरूपम यांना काँग्रेसने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबतच्या दाव्यांबाबत आणि हे दावे खोटे असल्याचं सांगणाऱ्या माहिती अधिकारातील माहितीबाबत विचारलं असता ते भडकले. सैन्याच्या अधिकाऱ्यांनीच त्या सर्जिकल स्ट्राईकबाबत पुष्टी केली आहे असं म्हणत निरूपम यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान काँग्रेसवर टीका करताना राजीव गांधी यांच्यावरही टीका केली होती. यामुळे काँग्रेस नेते भडकले असून निरूपमही त्यातले एक नेते आहेत. राजीव गांधी यांच्यावर टीका करून मोदींनी स्मृती इराणी यांना अमेठीमधून अडीच लाख मतांनी पराभूत करण्याची सोय करून दिली असा निरूपम यांनी दावा केला आहे. जर राजीव गांधी यांच्यावर मोदी टीका करत राहिले तर ते उरलेल्या जागाही हरतील असं निरूपम यांचं म्हणणं आहे. आजतकच्या वेबसाईटवर यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.




























































