
राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे आणखी एक उदाहरण पुढे आले. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगर दौऱ्यात सुरक्षा ताफ्यातील एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) कमांडो टीमसाठी 29 मोटारी भाडय़ाने घेतल्या होत्या, पण या मोटारींचे 12 लाख रुपयांचे भाडे गृह विभागाच्या वतीने आज तब्बल दोन वर्षांनी अदा करण्यात आले.
अहिल्यानगर जिह्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्याच्या निमित्ताने 26 ऑक्टोबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होता. मोदींच्या संरक्षण ताफ्यात नवी दिल्लीतून एसपीजीची टीम अहिल्यानगरला आली होती. एसपीजीच्या टीमसाठी अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांनी नाशिकमधील गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स या खासगी टुर कंपनीकडून 29 इनोव्हा मोटारी भाडय़ाने घेतल्या होत्या.
पंतप्रधानांच्या कोणत्याही दौऱ्याच्या काही दिवस आधी एसपीजीची टीम दाखल होते. या दौऱ्यात आलेल्या एसपीजी टीमसाठी 22 ते 28 ऑक्टोबर 2023 या काळासाठी 29 इनोव्हा मोटारी भाडय़ाने घेतल्या होत्या, पण या मोटारींचे भाडे दोन वर्षांपासून थकले होते. ही बिले अदा करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर गृह विभागाने आज या प्रस्तावास कार्योत्तर मंजुरी दिली आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टुर कंपनीला पैसे मिळाले आहेत.
दोन कंत्राटदारांच्या आत्महत्या
राज्याची आर्थिक स्थिती सध्या वाईट असल्यामुळे लाखो रुपयांची कंत्राटदारांची देणी थकली आहेत. शासकीय कंत्राटदारांची कोटयवधी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे आतापर्यंत दोन कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याच्या घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. शासकीय बिले थकल्यामुळे सार्वजनिक विभागाच्या पी. व्ही. वर्मा या कंत्राटदाराने आत्महत्या केली. या कंत्राटदाराची 40 लाख रुपयांची बिले सरकारने थकवली होती. काही महिन्यांपूर्वी सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. राज्यात शेतकऱ्यांच्या नंतर आता कंत्राटदारांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.