हिंदुस्थानच्या ‘जाँटी र्‍होड्स’चा क्रिकेटला रामराम, लिहिले भावूक पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानी क्रिकेट संघातील ‘जाँटी र्‍होड्स’ अशी उपाधी मिळालेल्या मोहम्मद कैफने शुक्रवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. कैफने सोशल मीडियावर याबाबत एक भावून पत्र पोस्ट केले आहे. कैफने १२ वर्षांपूर्वी हिंदुस्थानी संघासाठी आपला अखेरचा सामना खेळला होता.

२००२ मध्ये कैफने नेटवेस्ट सिरीजच्या फायनलमध्ये लॉर्डस मैदानावर ८७ धावांची धमाकेदार खेळी साकारली होती आणि टीम इंडियाला थरारक विजय मिळवून दिला होता. विशेष म्हणजे हा सामना १३ जुलैला खेळला गेला होता आणि आज बरोबर १६ वर्षांनी त्याच दिवशी कैफने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे.

कैफने आपल्या पत्रामध्ये लिहिले आहे की, ‘मी फर्स्ट क्लास क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेत आहे. आज त्या ऐतिहासिक नेटवेस्ट सीरिजला १६ वर्ष झाले आहेत ज्यामध्ये मी टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले होते. हिंदुस्थानसाठी खेळणे नेहमीच आनंददायी होते.’

टीम इंडियामधील चपळ खेळाडू, क्षेत्ररक्षणातील दादा आणि मधल्या फळीमध्ये संघाला मजबुती देणाऱ्या मोहम्मद कैफने आपला काळ गाजवला. त्याच्या क्षेत्ररक्षणावर सर्वच फिदा होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या वन डे विश्वचषकात सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखालील हिंदुस्थानचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. या संघात कैफही होता. तसेच कैफने उत्तर प्रदेशसाठी खेळताना रणजी ट्रॉफीही जिंकली आहे.

३७ वर्षीय कैफने हिंदुस्थानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर १३ कसोटी, १२५ एक दिवसीय सामने खेळले आहेत. तसेच प्रथम श्रेणीचे १२५ आणि टी-२० चे ४९ सामनेही कैफने खेळले आहेत. कैफने १३ कसोटीत ३२ च्या सरासरीने ६२४ धावा आणि १२५ एक दिवसीय सामन्यात ३२ च्या सरासरीने २७५३ धावा केल्या आहेत. दरम्यान, कैफने मैदान गाजवल्यानंतर आता क्रिकेट समालोचक म्हणून आपली दुसरी इंनिंग सुरू केली आहे.