
गिल गेल्या वर्षभरापासून हिंदुस्थानच्या संघातून बाहेर होता. गिलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी हिंदुस्थानसाठी सलामीला फलंदाजी केली होती. तिलक वर्मा बऱ्याचदा तिसऱया क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. गिलच्या पुनरागमनाने या क्रमात बदल होण्याची शक्यता आहे. गिल आणि अभिषेक सलामीला फलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संजू सॅमसनला तिसऱया क्रमांकावर संधी मिळायला हवी, असे मत हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने व्यक्त केले आहे.
आशिया कप क्रिकेट स्पर्धा अवघ्या एका आठवडय़ावर येऊन ठेपली असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. हिंदुस्थाननेदेखील स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत शुभमन गिलचीही संघात निवड झाली आहे. त्याच्याकडे उपकर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता पहिल्या तीन क्रमांकामध्ये कोण कुठल्या स्थानावर खेळणार, या प्रश्नावर क्रिकेट तज्ञांकडून मत व्यक्त करण्यात येत आहेत. पुढे कैफ म्हणाला, सॅमसन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने केरळ क्रिकेट लीगमध्येही शानदार खेळ केला आहे. तसेच त्याने गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध एक आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन शतके झळकावली होती. तिलक वर्माही चांगला खेळला असून त्यानेही आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके केली होती.