MasterChef India 2023 – ज्यूसचे दुकान चालवणाऱ्या मोहम्मद आशिकने पटकावलं विजेतेपद

मास्टर शेफ इंडिया 2023 (MasterChef India 2023) चा यंदाचा सीझन तब्बल सहा आठवडे सुरू होता. शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी मास्टर शेफची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. या अंतिम फेरीत 24 वर्षीय मोहम्मद आशिक (Mohammed Ashiq) याने मास्टर शेफ हे पद पटकावले आहे. आठ महिन्यांच्या संघर्षानंतर आशिकला मास्टरशेफची ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे.

मोहम्मद आशिक हा मुळचा कर्नाटकातील मंगळूरमधील रहिवासी आहे. कुलुक्की हब नावाच्या ठिकाणी त्याचे ज्यूसचे दुकान होते. त्याला लहानपणापासूनच स्वयंपाक बनविण्याची आवड आहे. त्याच्या या आवडीमुळेच त्याने मास्टरशेफमध्ये भाग घेतला होता.

आशिकने गेल्यावर्षी देखील मास्टरशेफमध्ये भाग घेतला होता. मात्र त्या सीझनमध्ये तो लवकर एलिमिनेट झाला. यंदाचा सीझनचे परिक्षण विकास खन्ना, रणवीर ब्रार, आणि पूजा ढींग यांनी केले. परिक्षकांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन केल्याने मोहम्मद आशिकला हे यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. मास्टर शेफच्या ट्रॉफी व्यतिरिक्त आशिकला 25 लाख रूपयांचे बक्षीसही मिळाले आहे.

आशिकसोबत रूखसार सय्यद आणि नंबी जेसिका हे स्पर्धकही अंतिम फेरी पर्यंत पोहोचचे होते. नंबी जेसिकाने दुसरा क्रमांक पटाकवला तर रूखसार सय्यद हिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. परिक्षक रणवीर ब्रार यांनी मोहम्मद आशिकला सोशल मीडियावर विजेता झाल्याने अभिनंदन केले आहे.