मोहम्मद शमी ठरला ‘विकेट्स’चा बॉस; अनोख्या विक्रमासह कपिल देव, आगरकरला मागे सोडले

29733
मोहम्मद शमी (हिंदुस्थान) - 21 लढतीत 42 बळी घेतले.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. 2019 या वर्षामध्ये एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम शमीच्या नावावर जमा झाला आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी नोंदवण्याची शमीची ही दुसरी वेळ आहे. याबाबतीत शमीने दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव, अजित आगरकर आणि इरफान पठान यांना देखील मागे सोडले आहे.

मोहम्मद शमीने 2019 या वर्षांमध्ये एक दिवसीय क्रिकेटमध्ये 21 लढतींमध्ये 42 बळी घेतले. या दरम्यान एकाच लढतीत पाच बळी आणि चार बळी घेण्याची कामगिरी शमीने दोनदा केली. यासह यात एका हॅटट्रीकचीही नोंद आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्या अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत शमीने ही हॅटट्रीक घेतली होती.

‘हिटमॅन’ रोहित शर्माचा भीमपराक्रम, जयसूर्याचा 22 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला

एकाच कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक बळी घेण्याची नोंद शमीने दोनदा केली आहे. याआधी शमीने 2014 ला 38 बळी घेतले होते. एकाच कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक बळींची नोंद करणारा शमी टीम इंडियाचा चौथा गोलंदाज ठरला. तसेच दोनवेळा अशी कामगिरी करणारा पहिला हिंदुस्थानी गोलंदाज ठरला. शमीआधी कपिल देव यांनी 1986 मध्ये 32 विकेट, अजित आगरकरने 1998 ला 58 विकेट आणि इरफान पठानने 2004 मध्ये 47 विकेटची नोंद केली.

2019 मध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज –

  • मोहम्मद शमी (हिंदुस्थान) – 21 लढतीत 42 बळी
  • ट्रेन्ट बोल्ट (न्यूझीलंड) – 20 लढतीत 38 बळी
  • लॉकी फर्ग्यूसन (न्यूझीलंड) 17 लढतीत 35 बळी

दरम्यान, मोहम्मद शमी याच्यासह पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये हिंदुस्थानच्या अन्य तीन गोलंदाजांचाही समावेश आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 33 आणि कुलदीप यादवने 32 बळी घेतले. हे दोघे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत, तर युझवेंद्र चहल 29 बळींसह नवव्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या