
सामना ऑनलाईन । नागपूर
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराबाबत मोठे विधान केले आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी सरकारने कायदा करून लवकरात लवकर मंदीर बांधायला हवे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. राम फक्त हिंदुंचेच नाहीत तर साऱ्या देशाचे आहेत. कोणत्याही मार्गाने राम मंदिर बनायलाच हवे, त्यासाठी सरकारने कायदा करावा. राम मंदिर उभारल्यास देशात सामाजिक सद्भावनेचे वातावरण निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी बोलताना भागवत म्हणाले की, लोक म्हणतात यांचे सरकार असूनही राम मंदिर का बनले नाही, मतदार फक्त एक दिवसाचा राजा असतो. त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक आपल्या मताचा वापर केला पाहिजे, नाहीतर एका दिवसासाठी पाच वर्ष भोगायला लागतात. असे सांगून भागवत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला. या सोहळ्याला नोबेल पुरस्कार विजेते डॉ. कैलाश सत्यार्थी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात देशातील वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडली. गेल्या काही दिवसात शहरी नक्षलवादाचा धोका वाढला असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. लोकांना भडकवण्याचं काम सुरू असून सरकार व समाजाविरोधात नक्षल्यांचे युद्ध सुरू आहे. त्यामुळे सरकारने शहरी नक्षलवादाविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी भागवत यांनी केली.
हिंदुस्थान कुणाचाही शत्रू नाही. पण जगात हिंदुस्थानाला अनेक शत्रू आहेत. त्यामुळे आपण नेहमी सज्ज राहायला हवे असे यावेळी भागवत यांनी सांगितले सुरक्षेसाठी कुणावर अवलंबून राहू नये. देशाने शस्त्र निर्मितीत स्वावलंबी व्हावे, असे भागवत म्हणाले. तसेच शेजारी देशात सरकार बदलले तरी त्यांची मानसिकता बदलणार नाही असे सांगून त्यांनी पाकिस्तानला टोला लगावला.

































































