लेख – मावळते वर्ष अपघातांचे समजले जाणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मोहन एस. मते

राज्यात गेल्या दहा महिन्यांत तब्बल 30 ते 32 हजारांहून अधिक वाहनांचा अपघात झाला असून त्यामध्ये 65 – 70 हजारांहून अधिक जणांना गंभीर दुखापत झाली आहे. 2022 मध्ये गंभीर जखमींचे प्रमाण 20-22 पटींहून अधिक वाढले आहे. 2021 मध्ये 47 हजार 307 वाहनांचे अपघात झाले असले तरी गंभीर जखमींची संख्या ही 2980 होती. त्यापूर्वीच्या  पाच–सात वर्षांमध्येही हे प्रमाण कमीच होते. त्यामुळे आज 2022 हे वर्ष अपघातांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे, ही बाब अर्थातच चिंताजनक आहे. वाढत्या रस्ते अपघातांची कारणे सर्वश्रुत असूनही त्याबाबत उपाययोजना होत नाहीत, ही खेदाची बाब आहे.

हिंदुस्थानसारख्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाचा उल्लेख सर्वाधिक अपघातबळींचा देश म्हणूनही केला जाण्याची स्थिती आज उद्भवली आहे. दोन वर्षांपूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने देशातील रस्ते अपघातांविषयी आकडेवारी प्रकाशित केली होती आणि त्यातून वर्षाकाठी होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये तब्बल एक लाख तरुण मृत्युमुखी पडत असल्याची धक्कादायक माहिती दिली होती. वाहतूक मंत्रालयाच्या प्रमुखांनी देशभरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी 85 ते 90 टक्के अपघात हे खराब रस्ते, तसेच अयोग्य सूचना फलक अशा विविध कारणांमुळे होत असल्याचे म्हटले होते. साहजिकच या आकडेवारींची, कारणांची योग्य दखल घेऊन त्यानुसार उपाययोजना केल्या जातील आणि  अपघातबळींचा आकडा कमी होईल अशी अपेक्षा होती, परंतु तसे घडताना दिसले नाही. जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यांत एकटय़ा महाराष्ट्रांमध्ये 17,275 अपघात झाले आणि त्यामध्ये 8068 जणांचा मृत्यू झाला. रस्ते अपघातांमध्ये बळी जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणांचे आहे, ही बाब दुर्दैवी आणि तितकीच चिंताजनक म्हणावी लागेल.

गतवर्षीच्या राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, महाराष्ट्रासह मुंबईमध्ये वाहनांची संख्या प्रचंड वाढत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले. महाराष्ट्रात आजही संख्या साडेतीन कोटींवरून साडेचार कोटींपर्यंत पोहोचली असून गर्दीने चेंगरलेल्या मुंबईतही संख्या 40 ते 45 लाखांवर जाऊन पोहचली आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा विचार केला, तर रस्त्यांची एकूण किलोमीटरमध्ये असलेली उपलब्धता आणि वाहनांची संख्या यात कमालीची तफावत पाहायला मिळते. वेगाने वाढत चाललेली वाहनसंख्या हे वाहन अपघातास कारणीभूत असणाऱ्या घटकांपैकी एक आहे, हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.

प्रचंड संख्येने सातत्याने अपघात होत असतानाही अपघातस्थळी तत्काळ वैद्यकीय मदत पोहचत नाही. वास्तविक ही मदत जरी वेळेवर मिळू लागली तरी अपघातांनंतर होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण निश्चितच कमी करता येऊ शकते. म्हणूनच याबाबत अधिक संवेदनशीलता दाखवली जाणे आवश्यक आहे.

देशात सरासरी 5 ते 7 कुटुंबामागच्या एक-दोन व्यक्ती या रस्ते अपघातांची शिकार होत आहेत. इतक्या भीषण समस्येकडे कोणी गांभीर्याने पाहू नये किंवा म्हणावी तशी सुधारणा होऊ नयेत याइतका दुसरा गुन्हा असू शकत नाही. म्हणूनच दरवर्षीच्या अंदाजपत्रकांमधून रस्ते बांधणीबरोबरच अपघात रोखण्यासाठीच्या मोहिमेसाठी निधी खर्च करण्याची भरीव तरतूद केली जाणे आवश्यक आहे. कारण हा मुद्दा थेट नागरिकांच्या जीवनाशी निगडीत आहे.

महाराष्ट्रात आज हजारो खासगी बसेस प्रवाशांची ने-आण करतात. त्यांच्या सुरक्षिततेची चांगल्या पद्धतीने खबरदारी घेतली जात नाही, हे उघड वास्तव आहे. प्रवासी वाहतूक करताना सुरक्षिततेसंदर्भातील काही नियम आहेत, पण ते सर्रास पायदळी तुडवले जातात. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून एक दरवाजा असतो, पण तो दरवाजाच उघडत नाही अशी स्थिती असते. दुसरीकडे आगीसारख्या घटना घडल्या, तर त्या विझवण्याची कोणतीही व्यवस्था अशा वाहनांमध्ये नसते. याखेरीज वाहन चालवताना दाखवला जाणारा निष्काळजीपणा हा तर बहुतेक अपघातांचे मूळ कारण आहे.

रस्ते अपघातांमधून दरवर्षी किमान 50 ते 60 हजार वाहनांची प्रचंड नासधूस होते. त्यामुळे होणारे नुकसान हे कोटय़वधींचे आहे.  त्यामुळे  वाहनसंख्येच्या महास्फेटाचा जबर तडाखा समाजव्यवस्थेला बसतो आहे. अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जाते. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले जातात, पण यातून एक प्रकारे या गंभीर मुद्दय़ाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न होतो. निरपराध प्रवासी बेजबाबदारपणा करणाऱ्या घटकांचे बळी ठरत असतात, परंतु त्यांचा कठोरपणे बीमोड करावा याबाबतचे गांभीर्य दिसत नाही.

 राज्यात मागील दहा महिन्यांच्या काळात तब्बल 30 ते 32 हजारांहून अधिक वाहनांचा अपघात झाला आणि त्यात 65 ते 70 हजारांहून अधिक जणांना गंभीर दुखापत झाल्याची एक आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. कोरोना काळाची दोन वर्षे वगळता त्यापूर्वीच्या वर्षांशी तुलना करता 2022 मध्ये गंभीर जखमींचे प्रमाण 20-22 पटींहून अधिक वाढले आहे. राज्यात जानेवारी-ऑक्टोबर या दहा महिन्यांत तब्बल 30 हजार 558 वाहनांचा अपघात झाला असून त्यात सुमारे 66 हजार जण गंभीर जखमी झाले आहेत. 2021 मध्ये 47, 307 वाहनांचे अपघात झाले असले तरी गंभीर जखमींची संख्या ही 2980 होती. त्यापूर्वीच्या  पाच-सात वर्षांमध्येही हे प्रमाण कमीच होते. याचाच अर्थ 2022 या वर्षांत अपघातात गंभीर जखमी होणाऱ्यांचे प्रमाण हे सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. त्यादृष्टीने 2022 हे वर्ष अपघातहानीचे वर्ष म्हणून गणले जाणार आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आजही प्रभावी आणि कार्यक्षम नसल्यामुळे वैयक्तिक वाहनांचा वापर वाढणे अपरिहार्य आहे. दैनंदिन व्यवहारासाठी वैयक्तिक वाहने गरजेची ठरतात. कामासाठी किंवा इतर निमित्ताने अनेक वेळा प्रवास अटळ ठरतो. याखेरीज पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्याही आज प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, परंतु दूरवरचाच नव्हे तर अगदी घराजवळचा प्रवासही आज सुरक्षित राहिलेला नाही, हे वास्तव आहे. हे चित्र बदलण्यासाठी शासनाला व्यापक मोहीम हाती घ्यावी लागेल. त्याचबरोबर नागरिकांनीही वाहन चालवतानाचा बेजबाबदारपणा, बेदरकारपणा टाळायला हवा. अन्यथा 2023 मध्ये अपघातहानी नव्या उच्चांकावर पोहोचल्यास नवल वाटायला नको.

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत)