
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना जाहीर झाला आहे. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीमधील बहुमूल्य योगदानासाठी मोहनलाल यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून 23 सप्टेंबर रोजी होणाऱया 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळय़ामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल या महान अभिनेता, निर्माता, दिग्दर्शकाचा सन्मान केला जात आहे. मोहनलाल यांचा चित्रपट प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सोशल मीडियावरून सुपरस्टार मोहनलाल यांचे अभिनंदन केले आहे.
g मोहनलाल यांनी गेल्या चार दशकांत मल्याळम, तेलुगू, तमीळ, कन्नड आणि हिंदी भाषेतील 350 हून अधिक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या कारकीर्दीची दखल घेत 2001 साली ‘पद्मश्री’ आणि 2019 साली ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.