कोटय़वधींच्या बँक घोटाळ्याचे धागेदोरे भाजपात, भाजप नेते मोहित कंबोजवर गुन्हे दाखल

2106

बँक ऑफ इंडियाची 57 कोटी 26 लाख रुपयांना फसवणूक झाल्याच्या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचा नेता मोहित कंबोज याच्यासह अनेकांविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना सीबीआयने मुंबईत आरोपींच्या पाच ठिकाणांवर धाडी घातल्या. त्यात अनेक महत्वाची कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती सीबीआयच्या हाती लागली आहे.

बँक ऑफ इंडियाने याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यावरून सीबीआयने मोहित कंबोज आणि त्याची मे. अव्यान ओव्हरसीज प्रा. लि., खासगी कंपन्यांचे संचालक जितेंद्र गुलशन कपूर, सिध्दांत बाग्ला, इर्तेश मिश्रा, तसेच केबीजे हॉटेल्स गोवा प्रा. लि. आणि बँकेच्या एका अधिकाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींची अनेक भाजपा नेत्यांशी जवळीक असल्याचे सांगितले जाते.

2013 ते 2018 च्या दरम्यान फोर्ट येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. बनावट कागदपत्रे वापरून आरोपींनी फॉरेन बिल्स निगोशिएशन आणि एक्सपोर्ट पॅकेजिंग क्रेडिट लिमिटेडच्या नावाखाली या शाखेतून 60 कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्यामुळे बँकेला 57 कोटी 26 लाखांचे नुकसान झाले. बँकेच्या काही अधिकाऱ्यांचाही या कटात सहभागी असल्याचा संशय आहे.

मुंबई भाजपाचा सरचिटणीस असलेला कंबोज याची सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. कंबोज याने भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्षपदही भूषवले होते. मुंबईतील काही भाजपा नेते आणि पदाधिकारी कंबोजला वाचवण्यासाठी थेट दिल्लीपर्यंत प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या