
मोहोळ तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून, तालुक्यातील 103 गावांपैकी 59 गावांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य अधिकारी अरुण पाचोरकर व सहायक नागनाथ थोरात यांनी दिली. उर्वरित गावेही आगामी आठ दिवसांत कोरोनामुक्त होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मोहोळ तालुक्यामध्ये 50 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असलेली गावे शून्य आहेत. पंचवीस ते पन्नासपर्यंत कोरोना असलेली गावेदेखील शून्य आहेत. 10 ते 25 रुग्ण असलेली गावे चार, पाच ते दहा रुग्ण असलेली गावे आठ आहेत. तर, एक ते पाच रुग्ण असलेली गावे 32 आहेत. अशी एकूण 44 गावे वगळता तालुक्यातील 59 गावांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नाही. कारोना रुग्ण असलेली गावेही आगामी आठ दिवसांत कोरोनामुक्त होतील, असा आशावाद आरोग्य अधिकारी अरुण पाचोरकर यांनी व्यक्त केला.
मोहोळ तालुक्यामध्ये 103 गावे असून, त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त गावे कोरोनामुक्त झाली आहेत. गावागावांमध्ये सॅनिटायझरची फवारणी करणे, रासायनिक फवारणी करणे, मास्क लावणे, गर्दी टाळणे, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सचे पालन करणे आदी गोष्टी गावागावांत करीत असल्यामुळे मृतांची संख्यादेखील कमी आहे. येत्या पंधरा दिवसांत मोहोळ तालुका कोरोनामुक्त करण्यात येईल, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे वैद्यकीय अधिकारी अरुण पाचोरकर यांनी सांगितले.


























































