गावठाण निर्मितीसाठी वन, महसूल, रेल्वे विभागाचे सर्वेक्षण होणार; मोखावणे-कसारा आदिवासी कुटुंबांना दिलासा

मोखावणे-कसारा वनक्षेत्रातील जमिनीवर गावठाण निर्मितीसाठी वन, महसूल – व रेल्वे विभागाचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे. वनमंत्र्यांनी तसे आदेश दिल्याने हक्काच्या घरांसाठी 30 ते 40 वर्षांपासून लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या आदिवासी कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मोखावणे-कसारा येथील वनविभागाच्या जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या ग्रामपंचायतीकडून घरपट्टीदेखील आकारली जाते. मात्र वनविभागाकडून नोटिसा बजावल्या जात असल्याने हे कुटुंबीय संभ्रमात पडले होते. या समस्यांच्या पार्श्वभूमीवर पीडित ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे विशेष बैठकीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीदरम्यान मोखावणे-कसारा गावठाण तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश वनमंत्री नाईक यांनी संबंधित विभागाला दिले.

कुटुंबीयांकडून नोटिसांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल
मोखावणे-कसारा येथील रहिवाशांकडून घर दुरुस्ती केल्यानंतर बजावल्या जाणाऱ्या नोटिसांबाबत योग्य कार्यवाही करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी वनमंत्र्यांनी आदिवासी कुटुंबीयांना दिले. दरम्यान वन, महसूल आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा, तत्काळ गावचा विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना नाईक यांनी दिल्या.