विनयभंग प्रकरणात आरोपीला पाच दिवसात शिक्षा

588

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केल्यानंतर पाच दिवसात दोन वर्ष सश्रम कारावासासह वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या तत्काळ कारवाईनंतर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला शिक्षा सुनावली आहे.

पीडित तरुणी ही 3 डिसेंबर रात्री आठच्या सुमारास तिच्या दुचाकी गाडीवरून घरी जात असताना एक अज्ञात व्यक्ती आपला पाठलाग करीत आहे, असे तिच्या लक्षात आले. तिने एका दुकानात थांबून पाठलाग करणाऱ्या व्यक्तीस पुढे जाऊ दिले. त्यानंतर ती पुन्हा आपल्या गाडीने घराकडे जात असताना तिला गाडीच्या आरशात तो पाठलाग करणारा इसम पुन्हा दिसला. रात्री 8.40 वाजताच्या सुमारास पाठलाग करणाऱ्या मुलाने त्याची मोटार सायकल पिडीत तरुणीच्या गाडीच्या समोर आडवी घातली. तिला अडवून तिच्याशी अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग केला.

पीडिता आरोपीला चेहऱ्यावरून ओळखत असल्यामुळे तिने साक्षीदारामार्फत त्याची संपूर्ण माहिती घेतली. तसेच घडलेल्या घटनेबाबत आईवडिलांना सांगितले. कुटुंबीयांनी तिला घडलेल्या घटनेबाबत पोलीसांकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यावरून पीडितेने रात्री पोलीस ठाण्यात आरोपी प्रथमेश बाबुराव नागले (23 रा पिरंदवणे, वाडाजून) याच्या विरोधात तक्रार दिलेली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेड कॉन्सटेबल एस.के.बेर्डे यांनी एका दिवसात तपासकाम पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. मुख्य न्यायदंडाधिकारी जी.जी.इतलकर यांनी प्रथमेश नागले याला दोन वर्षे कारावास आणि वीस हजाराचा दंड सुनावला. दंडाच्या रक्कमेतून 15 हजार रुपये पीडित तरुणीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश त्यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या