
सामना प्रतिनिधी । रत्नपूर
जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी लेणी कर्मचाऱ्याला लाल माकडाने चावा घेऊन जखमी केले. परिसरातील पर्यटक व इतर कर्मचाऱ्यांनी त्याची माकडाच्या तावडीतून सुटका केली.
लेणी कर्मचारी शेख बशीर हे कामावर जात असताना लेणी परिसरात लाल माकडाने त्यांच्यावर झडप मारून त्यांना खाली पाडले व पायाला चावा घेऊन जखमी केले. जवळपास असलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून माकडाच्या तावडीतून शेख यांची सुटका केली. रविवारी व्यावसायिक भास्कर गाडगे यांनाही माकडाने चावा घेतला होता.
जखमी शेख बशीर यांना जलद प्रतिसाद दलाचे जवान राम माळी यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तहानलेले वन्यप्राणी पाण्याचा शोधात लेणी परिसरात येत असून, यामध्ये काळ्या माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या माकडांमध्ये दोन लाल माकडेही आहेत. संपूर्ण माकडांवर दोन लाल माकडांचे वर्चस्व आहे. त्यातून माकडांच्या टोळ्या पडल्या आहेत. या टोळ्यांमध्ये वारंवार भांडणे होत असतात. हजारोंच्या संखेने येणारे देशी-विदेशी पर्यटक या माकडांना खाद्य पदार्थ देत असतात. यामुळे माकडांची संख्या वाढली आहे. येथील माकडे माणसाळली असली, तरी कधी कधी ती संतापून हल्ला करतात.






























































