
सिंधुदुर्गतील कडवळ परिसरात नाचणी काढणीचे काम पूर्ण झाले आहे, मात्र यंदा माकडांकडून नाचणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर माकडांनी नाचणीची सर्व कणसे फस्त करून फक्त चाराच शिल्लक ठेवला आहे. अतिवृष्टीमुळे यंदा भात उत्पादनात मोठी घट झाली असताना आता नाचणीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.
कडवळ येथील शेतकरी खरीप व उन्हाळी हंगामात काही प्रमाणात नाचणीची शेती करतात. पूर्वी झाडे तोडून, भाजणावळ करून मोठ्या प्रमाणात नाचणीची शेती केली जात होती. मात्र जंगलतोडीवर निर्बंध आल्याने नाचणी लागवडीखालील क्षेत्र कमी झाले. तरी आजही बहुतेक शेतकरी दोन्ही हंगामात वाफ्यांमध्ये नाचणी लागवड करतात. खरीप हंगामात तरवा लावणीचे काम पूर्ण झालो की नाचणी लावली जाते व भात कापणी पूर्ण झाली की, त्वरित नाचणीची केसरे काढली जातात.
परिसरात भात कापणीची कामे पूर्ण झाल्यानंतर येथील शेतकरी नाचणी काढणीकडे वळतात. मात्र यंदा माकडांकडून या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर माकडांनी सर्व कणसे फस्त करून फक्त ताडे तेवढी शिल्लक ठेवली आहेत.




























































