
सामना प्रतिनिधी । मुंबई
मोनोरेल पुन्हा सोमवारपासून रुळावर आली असून मोनोरेलला सध्या वीजपुरवठा करणाऱया यंत्रणेमार्फत ती चालविण्यात येत असल्याचे एमएमआरडीए प्रशासनाने म्हटले आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मोनोरेलला वीज पुरविणाऱया यंत्रणेत बिघाड झाल्याने मोनोरेलचे संचलन तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला होता.
सध्या मोनोरेलच्या ताफ्यात पाच ट्रेन असून त्यामार्फत दर 22 मिनिटांना संत गाडगे महाराज चौक-वडाळा-चेंबूर या मार्गावर मोनोरेलच्या फेऱया सोमवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. मोनोरेल डीसी करंटवर धावत असून तिला सातत्यपूर्ण वीज पुरवठा करणाऱया यंत्रणेचे काम इंग्लंडस्थित ‘फेव्हेली ब्रेकनेल विलीस’ या कंपनीला दिलेले आहे. या यंत्रणेची 30 ते 40 दिवस चालण्याची क्षमता जोरदार पावसाने 10 ते 15 दिवसांवर आली होती. फेव्हेली ब्रेकनेल विलीस कंपनीला जोपर्यंत पुढील मानधन मिळणार नाही तोपर्यंत तिने वीज पुरवठा यंत्रणा तयार न ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अडचण निर्माण झाली होती. या अडचणीमुळे पुणे येथील एका कंपनीला ही यंत्रणा तयार करण्यास सांगितले असून ही कंपनी वडाळा डेपोमध्ये लवकरच ती पुरविणार आहे. त्यानंतर मोनोरेल पुन्हा जोमाने सुरू करणे शक्य होणार आहे.
























































