
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले. दुपारी साडेतीनच्या सुमारास रत्नागिरी शहर आणि आजूबाजूच्या परिसरात रिमझिम पावसाने आगमन केले. सोसाटय़ाचा वारा आणि ढगाळ वातावरणामुळे जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र सायंकाळनंतर पुन्हा आकाश निरभ्र झाले.
गेले दोन-तीन दिवस रत्नागिरी जिह्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रत्नागिरी जिह्यात गेल्या २४ तासांत ४७.३० मिमी पाऊस पडला. सरासरी पाऊस५.२६ मिमी पडला. त्यामध्ये मंडणगड १.९० मिमी, दापोली १० मिमी, खेड १ मिमी, गुहागर ०.६० मिमी, चिपळूण ३.२० मिमी, संगमेश्वर १ मिमी, रत्नागिरी ३.९० मिमी, लांजा १२.३० मिमी, राजापूर तालुक्यात २३.३० मिमी इतका पाऊस पडला. आज भर दुपारी आभाळ मेघांनी भरल्यामुळे अंधारमय वातावरण निर्माण झाले होते. ढगांचा गडगडाट सुरू झाल्याने अनेकजण पावसाची प्रतीक्षा करत होते. दुपारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
वीज पडून तरुणाचा मृत्यू
मान्सूनपूर्व पावसाने जिह्यात पहिला बळी घेतला. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळू लागला. त्याचवेळी निवळी तारवेवाडी येथे एका घरावर वीज पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. निवळी तारवेवाडीतील घवाळी कुटुंबीय घराच्या शेजारी असलेल्या गोठय़ामध्ये साफसफाई करत होते. त्या वेळी पंकज घवाळी (२५) हा घराच्या बाहेरील भिंतीजवळ येऊन उभा राहिला. विजांचा कडकडाट सुरू होता आणि पाऊसही सुरू झाला. त्याचवेळी अचानक घवाळी यांच्या घरावर वीज पडली. या विजेच्या धक्क्याने पंकज घवाळीचा मृत्यू झाला. पंकजला त्याच अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्या पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

































































