रानभाज्या महोत्सव

1341

दुर्गेश आखाडे,[email protected]

कोकणातील रानमाळावर आणि जंगलात अनेक रानभाज्या पावसाळय़ात उगवतात. अतिशय चविष्ट आणि औषधी अशा रानभाज्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे. ग्रामीण भागात राहणारा शेतकरीवर्ग ही भाजी शोधून काढतो आणि ती बाजारात विक्रीला आणतो.

पावसाळय़ात कोकण बहरू लागतं. डोंगरदऱया हिरवाईने नटतात. पावसाचा थेंब जमिनीवर पडताच अनेक दुर्मिळ वनस्पतींचे जीवनमान सुरू होते. कोकणातील रानमाळावर आणि जंगलात अनेक रानभाज्या पावसाळय़ात उगवतात. अतिशय चविष्ट आणि औषधी अशा रानभाज्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे. ग्रामीण भागात राहणारा शेतकरीवर्ग ही भाजी शोधून काढतो आणि ती बाजारात विक्रीला आणतो. साधारण पावसातील हे दोनतीन महिने दऱयाखोऱयात राहणाऱया शेतकऱयाचे रानभाज्या हे उदरनिर्वाहाचे साधन होते. गावातील महिला जंगलातील रानभाज्या शोधून त्या शहरामध्ये विक्रीसाठी आणतात. या रानभाज्यांमुळे कनवटीला चार पैसे जमा होतात.

टाकळा – पावसाळा सुरू झाला की रानमाळावर टाकळा उगवतो. कोकणात अनेक ठिकाणी उगवणाऱया टाकळय़ाची भाजी आवडीने खाल्ली जाते. विशेष म्हणजे गावातील महिला हा टाकळा तोडून विक्रीसाठी शहरामध्ये आणतात. 10 रुपये, 15 रुपये जुडीने टाकळय़ाची विक्री केली जाते. लोकंही आवडीने हा दुर्मिळ टाकळा खरेदी करतात. टाकळा हा गुणकारी आणि कृमीनाशक असल्यामुळे खाद्यपदार्थात सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरते.

kantole

कर्टुले कार्टुले ही जंगलामध्ये आढळतात. पावसाळा सुरू झाला की साधारण आषाढ महिन्यात कार्टुले पाहायला मिळतात. कार्टुले ही कारल्यासारखी, पण आकाराने लहान असतात. जंगलाच्या डोंगराळ भागात सापडणारी कार्टुलाची भाजी लोक आवडीने खातात. काही ठिकाणी कार्टुलाची लागवड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 केणा तणवर्गीय वर्गामध्ये येणारी ही भाजी आहे. पावसाळय़ात रस्त्याकडेला केणा उगवतो. ज्या ठिकाणी ओलसर जागा असते अशा ठिकाणी केणा उगवलेला पहायला मिळतो. केण्याची भाजी ही बाजारात विक्रीसाठी दिसून येते.

बांबूचा कोंब पावसाळय़ात बांबूला येणाऱया कोंबाची भाजी गावामध्ये आवडीने खाल्ली जाते. बांबूच्या शेंडय़ाला आलेला कोंब काढून ग्रामीण भागात घरोघरी जेवणात भाजी म्हणून त्याचा वापर होतो. बांबूची गावात लागवड केलेली असते. पावसाळय़ात येणारे कोंब काढून त्याची भाजी केली जाते.

करंदा ही वनस्पती कळीसारखी असते. ती रताळे किंवा बटाटय़ासारखी गोलाकार होत जाते. ही भाजी थोडी कडवट लागते, पण लोक ती आवडीने खातात. पावसाळय़ामध्ये जंगलात करंदा उगवतो. आषाढ ते भाद्रपद या काळात डोंगरदऱयातील वस्त्यांमधील जेवणाच्या थाळीत करंदाची भाजी दिसून येते. जंगलातील करंदा काढून गावातील महिला शहरात विक्रीसाठी आणतात.

हादगा पावसाळय़ामध्ये उगवणारी हादगा या वनस्पतीच्या फुलांची भाजी करतात. हादगा रानमाळावर किंवा जंगलामध्ये उगवते. हादग्याची फुले भाजीसाठी बाजारात विक्रीसाठी आणतात.

कणगर – करंदासारखीच लांबट आकाराची ही रानफळभाजी आहे. रताळे, बटाटय़ाप्रमाणेच यामध्ये अन्नसंचय केला जातो. पावसाळय़ात कणगर ही जंगलात उगवते. कणगर शोधून आणून त्याची भाजी केली जाते. एक औषध रानफळ म्हणून कणगरची ओळख आहे.

घोळ मेथीसारखा दिसणारा हा एक रानभाजीचा प्रकार आहे. ही भाजी थोडी आंबट असते. घोळच्या पानांची भाजी केली जाते. जंगलातून घोळची वनस्पती शोधून तिची पाने तोडली जातात.

mayalu

मायाळू – पावसाळय़ात मायाळूची वेल उगवते. मायाळूच्या लाल पानांची भाजी केली जाते. मायाळूचे वेल हे रानामध्ये वाढतात.

कुडा – पावसाळय़ात येणाऱया या रानभाजीच्या शेंगांची आणि फुलांची भाजी केली जाते. या फुलांपासून सांडगीही तयार केली जातात. कुडा हा अनेकवेळा बारा महिनेही जंगलात आढळतो. कुडय़ाची भाजी औषधी म्हणून आहारात घेतली जाते.

फुरशी – गवतवर्गीयांमध्ये येणारी ही भाजी गवताच्या पातीसारखीच असते. विशेष म्हणजे फुरशी कातळावर उगवते. ग्रामीण भागातील महिला, पुरुष कातळावर उगवणारी फुरशी गोळा करुन भाजी म्हणून वापर करतात.

बारंगी – बारंगीच्या फुलांची भाजी आषाढ-श्रावणामध्ये खाल्ली जाते. बारंगीची चव ही थोडी कडवट असते. बारंगीच्या कोवळय़ा फुलांची आणि पानांची भाजी केली जाते. ही फुले बाजारात विक्रीसाठी आणतात. बारंगी ही एक औषधी रानभाजी आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या