
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
रायगड जिल्ह्यातील घारापुरी बेटावरील मोराबंदर येथे गुरूवारी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. वाशी येथील बेपत्ता नमन दत्त (17) याचा हा मृतदेह मोरा पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेहावरील कपड्यावरून हा मृतदेह नमनचा असल्याचे त्याच्या कुडुंबियांनी सांगितले आहे. नमन हा नैराश्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून घर सोडून गेला होता. त्याबाबत वाशी पोलीस ठाण्यात मदन हरवल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी दाखल केली होती.
घारापूरी बेटावरील मोरा बंदर येथे किनाऱ्यावर वाहून आलेला मृतदेह कुजल्यामुळे ओळखता येत नव्हता. त्यामुळे मृतदेहावर आढळलेल्या कपड्यावरून मोरा पोलिसांनी तपास केला असता, वाशी येथून बेपत्ता झालेल्या नमन दत्तच्या कपड्यांशी मिळते जुळते असल्याने त्यांनी वाशी पोलिसांना संपर्क साधला. वाशी पोलिसांनी नमन दत्तच्या पालकांना त्याचे कपडे दाखवले असता ते नमनचेच असल्याचे त्यांनी ओळखले. मात्र चेहरा आणि मृतदेह ओळखता येण्यासारखा नसल्याने त्यांनी डीएनए तपासणी करण्याची मागणी केली आहे. या बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.































































