23 वर्षे जोपासलेली झाडे कापणार, 4 हजार झाडांची कत्तल करण्यास केंद्र सरकारची वीज कंपनीला परवानगी

खारघर ते पडघा दरम्यान नवीन उच्च दाबाची वायर टाकण्याते आणि मनोरा उभारण्याचे काम ‘मुंबई ऊर्जा मार्ग निगम लिमिटेड’ने हाती घेतले आहे. पण, या कामासाठी 4,137 झाडांचा बळी देण्यात येणार आहे. कल्याणच्या पोई गावातील नागरिकांनी गेली 23 वर्षे ही झाडे जोपासण्याचे काम केले आहे. ही झाडे कापण्यात येणार असल्याने इथले नागरीक भयंकर संतापले आहेत.

कल्याण जवळील पोनी गावाजवळचे जंगल इथल्या नागरिकांनी प्राणपणाने जपलं आहे. या भागात झाडे कापणे, वाहने नेणे आणि गुरांना चरण्यास मनाई करण्यात आली आहे. वीज कंपनीने केंद्र सरकारची परवानगी घेत इथे झाडे तोडण्यास सुरूवाच केली. ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला तरीही ही कत्तल सुरू करण्यात आली आहे. सन 2000 मध्ये वनविभागाने पोनी गावातील या ओसाड माळरानावर जंगल निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ग्रामस्थांची संयुक्त वन समिती स्थापन केली होती. या समितीने गावातील तरुणांच्या मदतीने इथे मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड केली होती. या जंगलावर ग्रामस्थ 24 तास पाळत ठेवून असायचे. जंगलाचे रक्षण व्हावे यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली होती. त्यानुसार जंगल क्षेत्रात झाडे तोडण्यास, वाहने चालविण्यास आणि चराईला बंदी घातली होती. समितीने केलेल्या कौतुकास्पद कार्याची दखल घेतं 2012 मध्ये तत्कालीन वनमंत्र्यांनी या समितीला पुरस्कार दिला होता.

पोनी गावांतर्गत 565 हेक्टर राखीव जमीन आहे, त्यापैकी 62 हेक्टर संरक्षित वन आणि 214 हेक्टर महसूल क्षेत्र आहे. विशेष म्हणजे या भागात 80 टक्के झाडे सागाची आहेत. आतापर्यंत 350 झाडे तोडण्यात आली आहेत. या टॉवरमधून जाणाऱ्या हाय एक्सटेंशन पॉवर लाईनच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या उर्वरीत झाडांना चिन्हांकीत करण्यात आले असून ती झाडे सुध्दा तोडण्यात येणार आहेत.

वर्षांनुवर्षे गावकाऱ्यांनी आपल्या मुलाबाळांप्रमाणे झाडांचे संगोपन केले आहे. मात्र, जानेवारी महिन्यात या जंगलात वीजवाहिनीचे टॉवर उभारण्यासाठी वनविभागाने ‘मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड’ या वीज कंपनीला झाडे तोडण्याची परवानगी दिली. ग्रामस्थांनी या जुलुमशाहीला विरोध दर्शवला. पण, आमच्याकडे केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाची परवानगी असल्याचे सांगत  कंपनीने गावकाऱ्यांच्या विरोध मोडून काढला.

कल्याण परिक्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने म्हणाले की, “वीज कंपनीला दुप्पट झाडे लावण्याचे आश्वासन देऊन झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आम्ही जास्तीत जास्त झाडे वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

गावकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, आम्ही विकासाच्या विरोधात नाहीत पण वनविभागाने गेल्या 23 वर्षांपासून संरक्षित असलेली झाडे तोडू नयेत. सुकर्य अघान या गावकऱ्याने आपली व्यथा सांगितली, “आम्ही आदिवासी लोकं आहोत आणि रानभाज्या विकून उदरनिर्वाह करतो. आम्ही कंदमुळे खातो आणि या दोन्हीसाठी आम्ही जंगलावर अवलंबून आहोत. हे जंगल तोडल्याने आमच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होईल.