राज्यातील 70 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका, मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय कृषीमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरू करून केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. व्याज परतावा बंद झाल्याने राज्यातील 70 लाखांपेक्षा जास्त शेतकऱयांना फटका बसण्याची शक्यता आहे असे पत्रात नमूद केले आहे.

पीक कर्जावरील व्याज परतावा बंद करण्याचा निर्णय अलीकडेच केंद्र सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्र पाठवले आहे. दरम्यान, राज्यस्तरीय बँकर्स कमिटीची बैठक ‘सह्याद्री’अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा व्याज परतावा परत सुरू करण्याबाबतचा ठराव या बैठकीत करण्यात आला.

सहकारी बँका अडचणीत

केंद्र सरकारने 28 मार्च 2022ला जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे अल्प मुदतीच्या पीक कर्ज वाटपात बँकांना दिला जाणारा दोन टक्के व्याज परतावा बंद केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे चालू वर्षात पीक कर्ज वाटपात बँकांना केंद्र शासनाचा दोन टक्के व्याज परतावा मिळणार नाही आणि जिल्हा सहकारी बँका आर्थिक अडचणीत येऊन त्याचा प्रतिकूल परिणाम पीक कर्ज वाटपावर होईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी

या निर्णयामुळे बँकांना दोन टक्के दराचा व्याज परतावा मिळणार नसल्याने बँकांना व्याजाचे नुकसान होणार असून त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे खतांच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. त्यामुळे दोन टक्के व्याज परतावा योजना पूर्ववत सुरू ठेवावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.