
मुंबईत 18 आणि 19 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये तब्बल साडेतीन हजार तक्रारी पह्नवरून आणि ऑनलाइन दाखल झाल्या. या सर्व तक्रारींची दखल घेऊन निपटारा केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून अत्यंत तत्परतेने आणि जलदगतीने कार्यवाही करण्यात आली. पालिका आयुक्त-प्रशासक भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे शेकडो कर्मचारी अहोरात्र काम करीत होते. अतिवृष्टीच्या 48 तासांच्या कालावधीत 18 कर्मचारी आपत्कालीन नियंत्रण कक्षातच मुक्कामी राहून सलगपणे कार्यरत होते. या कालावधीत महानगरपालिकेच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर आलेल्या तक्रारांमध्ये पाणी साचणे, झाडे, फांद्या, घरे किंवा भिंती पडणे यासंबंधीत तक्रारी आणि भरती, ओहोटी, वाहतुकीसंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या कॉल्सचा समावेश होता.
रेल्वे प्रवाशांचे हाल
बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने उपनगरी रेल्वेच्या रुळांवर साचलेले पाणी ओसरले. मात्र तिन्ही रेल्वे मार्गांवर दिवसभरात जवळपास 150 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या. त्याचा संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम झाला. लोकल फेऱया निर्धारित वेळेपेक्षा 20 ते 35 मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांचे हाल झाले.
एनडीआरएफ, अग्निशमन दलाची जिगरबाज कामगिरी
कुर्ला भागातील क्रांतिनगर येथे दरडप्रवण परिसरातील सुमारे 350 नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम त्यांनी केले. तसेच त्यांचे निवास, भोजन आणि आरोग्यविषयक सेवा देण्यात आली. चेंबूर येथे मोनोरेलमध्ये अडकलेल्या 582 प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्याची जिगरबाज कामगिरी पालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने पार पाडली.
पिंपरी शहरात झालेल्या संततधार पावसामुळे व धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत होती.