चतु:शृंगीत 12 जणांना मॉर्निंग वॉक भोवले, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही रस्त्यावर सकाळी साडेसहा वाजता विना मास्क मॉर्निंग वॉक करणाऱ्या 12 जणांवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना संचारबंदी करण्यात आली आहे. त्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात आली आहे. असे असतानाही बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चतु: श्रुगी परिसरातील रस्त्यावर 12 नागरिक विना मास्क चालत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना विचारणा केली. मात्र, समाधानकारक उत्तर न देता त्यांनी मॉर्निंग वॉकला बाहेर पडल्याचे सांगितले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून मास्क न वापरल्यामुळे 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे, चोबे, बर्डे यांच्या पथकाने केली.