ना खिशात रोकड, ना बँक खात्यात बॅलन्स, हा आहे देशातला सर्वात गरीब उमेदवार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुजफ्फरनगर

2019च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने कोट्याधीश आणि अब्जाधीश उमेदवारांची नामावली समोरयेत आहे.त्या पार्श्वभूमीवर यूपीतल्या मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले अॅड .मांगेराम हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरणारे देशातील सर्वात गरीब उमेदवार ठरणार आहेत.

मांगेराम यांनी 2000 मध्ये सुमारे 1 हजार शेतमजूर आणि कष्टकऱ्यांना घेऊन मजदूर किसान युनियन नावाचा पक्ष स्थापन केला.तेव्हापासून ते प्रत्येक लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि प्रत्येक निवडणुकीसाठी खर्च करीत अधिक गरीब होत आहेत. त्यांच्याकडे ना रोकड आहे, ना बँक खात्यात जमा पुंजी. तरीही निवडणूक लढवण्याची जिद्द मात्र कायम आहे. मांगेराम घरोघर पायी जाऊन आपला प्रचार करतात. घरी मोटारसायकल आहे. पण त्यात पेट्रोल भरायला पैसे नाहीत. त्यामुळे ते मतदारसंघात पायी फिरतात. प्रत्येक वेळेस काबाडकष्ट करून जमवलेली त्यांची निवडणूक अनामत जप्त होते. कारण बड्या राजकीय पक्षांच्या आखाड्यात मांगेराम यांना मतदार मतेच देत नाहीत. तरीही एकदातरी गरीब मजुरांच्या भल्यासाठी आपण निवडून येऊ असा दुर्दम्य विश्वास मांगेराम यांना आहे.

ना दागिने ,ना पैसे ,ना बँक बॅलन्स
मांगेराम यांचे घरही त्यांच्या सासरच्या मंडळींनी भेट म्हणून दिले आहे. वकिलीच्या प्रॅक्टिसवर मिळणाऱ्या मोजक्या उत्पन्नात त्यांचे कुटुंब चालले आहे.पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. मोटारसायकल घरासमोर उभी आहे.पण पेट्रोलला पैसे नसल्याने मांगेराम पायीच प्रवास करतात.