बढिया बटर‌ चिकन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

पदार्थाच्या नावावरून आपण त्या पदार्थाचा उगम कुठे झाला असेल याचा बऱयाचदा अंदाज बांधतो. हिंदुस्थानी चिकन डिशेसमधला उपाहारगृहात बऱयाचदा मागवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे बटर चिकन. नावावरून हा पदार्थ इंग्रजाळलेला वाटला तरी याचा उगम अस्सल हिंदुस्थानी मातीतला आहे. अशा या बेस्ट सेलर चिकन डिशची ही लोणीदार गोष्ट…

हिंदुस्थानी उपखंडातला उत्तरेकडचा भाग चवीने खाणाऱया मंडळींचा. त्यात तिथे पडणारी कडाक्याची थंडी पाहता मांसाहारी पदार्थ आणि त्यात होणारा तेल, तूप, लोण्याचा सढळ वापर ही गोष्ट सहज ठरावी. याच भागावर मोगलांच्या पाककृतींचा प्रभावही सर्वाधिक आढळतो. त्यामुळे पंजाब, हरयाणा भागांत मुर्ग मखनी नावीन्यपूर्ण नव्हती. खूप साऱया बटरचा, माखनचा वापर करून बनवलेली ही डिश उत्तर हिंदुस्थानात लोकप्रिय असणार. मात्र आधुनिक काळात या पदार्थाला लोकप्रिय करण्याचं श्रेय दोन व्यक्तींना जातं. कुंदनलाल जग्गी आणि कुंदनलाल गुजराल यांनी हा पदार्थ बटर चिकन म्हणून नव्याने लोकप्रिय केला.

फाळणीनंतर पेशावरमधून दिल्लीत स्थायिक झालेले हे पंजाबी हिंदू. पेशावरमध्ये त्यांचं उपाहारगृह होतं. हिंदुस्थानात आल्यावर जुन्या दिल्लीत ‘मोती महल’ हे रेस्टॉरंट या दोघांनी सुरू केलं. असं म्हणतात, अपघातानेच ही बटर चिकन डिश त्यांच्याकडून तयार झाली. या पदार्थाच्या उगमाबद्दल दोन कथा आढळतात. एक कथा सांगते की, जग्गी आणि गुजराल यांचं
हॉटेल तुफान चालत होतं. वेगवेगळय़ा चिकन डिश इथं तयार होत. त्यातलं तंदुरी चिकन प्रसिद्ध होतं. टोमॅटो प्युरी आणि बटरमध्ये हे तंदुरी चिकन टॉस करून त्यांनी बटर चिकनसारखा पदार्थ खवय्यांना दिला.

दुसरी कथा साधारण अशीच. पेशावरमधल्या प्रसिद्ध मुखासिंग यांच्या ‘मुखे दा धाबा’मध्ये पुंदनलाल गुजराल काम करत. मुखासिंग यांच्या मृत्यूनंतर त्या धाब्याची जबाबदारी गुजराल यांच्याकडे आली. त्यांनी ‘मुखे दा धाबा’चं ‘मोती महल’ असं नामांतर केलं. फाळणीनंतर मग हिंदुस्थानात येणं वगैरे कथा सारखीच, पण तंदुरी चिकन ही खासीयत असणाऱया ‘मोती महल’मध्ये सीखवर लटकणारे तंदुरी चिकन दिवसभर तंदूरमुळे कोरडं होऊन जाई. अशा या कोरडय़ा चिकनचं काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर शोधताना कोरडेपणा दूर करणाऱया माखनची, बटरची आणि टोमॅटो प्युरीची जोड गुजराल यांनी या चिकनला दिली आणि टाकाऊतून टिकाऊ असा हा पदार्थ जन्माला आला.

यातली कोणतीही कथा खरी असो, पण ‘मोती महल’चे बटर चिकनला नव्याने जगासमोर आणण्याचे योगदान वादातीत आहे. तसं बघायला गेलं तर वेगवेगळय़ा
हॉटेलमध्ये असे प्रयोग होतच असतात, पण ते सगळे लोकप्रिय होत नाहीत. जग्गी आणि गुजराल यांचा प्रयोग यशस्वी झाला. कारण ‘मोती महल’ त्या वेळी इतपं विलक्षण लोकप्रिय होतं की, खुद्द पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, जॉन एफ. केनेडी यांच्यासारखे दिग्गज इथल्या जेवणाची तारीफ करत. त्या लोकप्रियतेमुळे बटर चिकन प्रसिद्ध झालं. आज जगभरात इंडियन कुझिन म्हणून बटर चिकन खाल्लं जातं. अर्थात देशागणिक त्यातल्या पाककृतीत बदल होतात. जसं की, अमेरिकेत क्रीम आणि टोमॅटो सॉस वापरून हे बटर चिकन बनवलं जातं. नावातील बटरमुळे ही डिश गोडुस असावी असा गैरसमज होतो. मात्र अस्सल देसी मसाल्यांच्या तडक्यासह मीडिअम स्पायसी बटर चिकन अस्सल खवय्यांना एक लजीज अनुभूती देतं. विशेष काही खाण्याचा मूड असो वा नसो, हॉटेलमध्ये गेल्यावर चवदार पण साधं, सोपं आणि भरपेट काही खाण्याचा अनुभव हवा असेल तर बटर चिकन बेस्ट पर्याय. रोटीसोबत बटर चिकनचा घास म्हणजे मख्खनमय लोणीदार अनुभवाची शाश्वतीच!