फरार आरोपी पुन्हा फरार; गावठी कट्यासह तीन काडतुसे जप्त

खंडणी, मारामारी दहशत पसरविणे, धमकावणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील हवा असणारा गुन्हेगार फरार होता. या फरार आरोपीच्या वाहनाचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीसांनी धाव घेत वाहनातून गावठी कट्यासह तीन जिवंत काडतुस जप्त केली. पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी पुन्हा पसार झाला. ही घटना बेलापूर परिसरात घडली.

पोलिसांनी आरोपीच्या वाहनातून गावठी कट्ट्यासह, तीन काडतुसे जप्त केली. तसेच वाहनचालक नितीन शर्मा याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर चालकाविरुध्द विनापरवाना शस्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना बेलापूर ग्रामस्थांच्या दबावामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया थांबवावी लागली.

विविध गुन्ह्यातील संशयीत फरार आरोपी आकाश बेग उर्फ टिप्या बेग याच्या वाहनाचा श्रीरामपुर-बेलापूर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.अपघातानंतर दोन्ही वाहन चालकांची तडजोड करुन वाहने दुरुस्तीसाठी पाठविण्याचे ठरले. ही माहिती पोलिसांना मिळाली. शहर पोलिसांनी बेलापुरातील आरोपीचे वाहन चालक नितीन शर्मा याला ताब्यात घेत गावठी कट्यासह तीन काडतुसे जप्त केली.

याप्रकरणी शर्मा याच्यावर विनापरवाना शस्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही माहिती मिळताच बेलापूर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. शर्मा केवळ वाहनचालक असल्याने त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करु नये, अन्यथा गाव बंद ठेवत रास्तारोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यामुळे ग्रामस्थांच्या दबावामुळे शर्मा यांना चौकशीनंतर सोडण्यात आले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी बेग याचा शोध सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या