
पंधरा दिवसांच्या तान्हुल्याला दोन तरुणींच्या स्वाधीन करून निर्दयी माता लोकलमधून पसार झाल्याची घटना हार्बर लाईनवरील सीवूड्स स्थानकात घडली आहे. आपल्याजवळ खूप सामान असल्याची बतावणी करून महिलेने आपल ` बाळ दोन अनोळखी तरुणींच्या हातात दिले. मात्र ही महिला लोकलमधून न उतरताच फरार झाली आहे. याबाबत वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या बाळाला वाशीतील एका रुग्णालयात दाखल केले असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. जुईनगर येथे राहणाऱ्या दिव्या नायडू (19) आणि तिची मैत्रीण भूमिका माने या दोघी चेंबूरहून घरी जात होत्या. त्यावेळी त्यांना 30 ते 35 वयोगटातील महिला सानपाडा स्थानकात भेटली. ‘माझ्याकडे बाळ आणि सामान आहे, मला सीवूड्स स्थानकात उतरायचे आहे, कृपया मदत करा,’ अशी विनंती करत सीवूड्स स्थानक येताच या महिलेने तिचे बाळ या तरुणींच्या हातात दिले. मात्र गाडी सुरू होऊनही ही महिला लोकलमधून खाली उतरलीच नाही. सुरुवातीला अधिक सामान असल्याने बाळाची आई उतरू शकली नसावी, असा समज या दोघींनी केल 1. मात्र बराच वेळ वाट पाहूनही महिला परतली नाही. त्यामुळे त्यांनी बाळासह घरी जात त्याची काळजी घेतली. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी निर्दयी मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तापासासाठी चार पथके रवाना
महिलेच्या शोधासाठी पोलिसांनी चार शोध पथके तयार केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात संबंधित महिला खान्देश भागातील असल्याची शक्यता आहे. मात्र स्थानकांवरील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याने तपासाला अडथळा येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाळाच्या आईविषयी कुणाकडे माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.