
गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे अंधश्रद्धेला बळी पडून आईनेच आपल्या दोन मुलांची निर्घृण हत्या केली आहे. या महिनेले आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा यासाठी आपल्या दोन अल्पवयीन मुलांना मारण्याचा कट रचला. एवढेच नाही तर या महिलेने मुलांसोबत सासऱ्यालाही मारण्याचा कट रचला होता. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता शर्मा असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री नवसारी जिल्ह्यातील बिलीमोरा शहरातील देसरा परिसरातील एका फ्लॅटमध्ये घडली. या घरात आरोपी महिला सुनीता शर्मा, तिचा पती शिवकांत, 7 आणि 4 वर्षांचे दोन मुलगे आणि तिचे सासरे इंद्रपाल यांच्यासोबत अपार्टमेंटमध्ये राहत होती.
सुनीताचे सासरे इंद्रपाल त्यांचा मुलगा शिवकांत याला जेवण देण्यासाठी रुग्णालयात गेले होते. तेथून उशीरा घरून आल्यानंतर ते झोपून गेले. यावेळी सुनीता आपल्या खोलीत झोपली होती. मध्यरात्री अचानक सुनीताने झोपेतून उठून देवतेची प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि यानंतर तिने पूर्वजांच्या मोक्ष प्राप्तीसाठी आपल्या मुलांचा बळी देण्याचा कट रचला. यावेळी आरोपी महिलेने दोन्ही मुलांचा गळा दाबून हत्या केली.
आपल्या दोन्ही अल्पवयीन मुलांचा जीव घेतल्यानंतर सुनीता सासऱ्यांच्या खोलीत गेली आणि त्यांना देखील गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सासरे इंद्रपाल कसेबसे सुनीताच्या तावडीतून निसटले आणि त्यांनी आराडाओरडा करत शेजाऱ्यांची मदत मागितली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी महिलेला अटक केली आहे. सध्या पोलीस पुढील प्रकऱणाची चौकशी करत आहेत.


























































