अंधेरीत आईनेच केली गतिमंद मुलीची हत्या, पोस्टमार्टेममध्ये उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गतिमंद मुलीच्या त्रासाला कंटाळून आईनेच मुलीची हत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. वैष्णवी पत्याने असे मृत मुलीचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी श्रद्धा पत्यानेला अंधेरी पोलिसांनी अटक केली.

श्रद्धा ही पती आणि तीन मुलींसोबत अंधेरी पारशीवाडा येथे राहत होती. तिची मुलगी वैष्णवी गतिमंद असल्याने तिचा सांभाळ करणे श्रद्धाला झेपत नव्हते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने श्रद्धा सकाळी नाश्त्याची गाडी लावत होती. काही महिने श्रद्धाने वैष्णवीला घरात एकटेच ठेवून ती नाश्त्याची गाडी लावायची. घरात वैष्णवीला एकटे ठेवणे योग्य नसल्याने श्रद्धाने नाश्त्याची गाडी लावणे बंद केले.

वैष्णवीच्या होणाऱया त्रासाला ती कंटाळली होती. बुधवारी पती कामावर गेल्यानंतर श्रद्धाने वैष्णवीची गळा आवळून हत्या केली. वैष्णवीने स्वतःच गळफास लावून आत्महत्या केली असा बनाव रचला. या घटनेची माहिती समजताच अंधेरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. वैष्णवीची गळा दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. वरिष्ठ निरीक्षक संताजी घोरपडे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक गुंडरे आणि पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान तिने वैष्णवीच्या हत्येची कबुली दिली.