बेपत्ता मुलीच्या आईचा आत्मदहनाचा प्रयत्न, नगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 दोन-तीन महिने होऊनही अल्पवयीन मुलीस पळवणाऱया आरोपीचा तसेच बेपत्ता मुलीचा शोध न लावल्याने नगर तालुका पोलीस यंत्रणेचा निषेध करत मुलीच्या आईने पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱयांनी तिला तत्काळ अडवत ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

 नगर तालुक्यातील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी मागील 2-3 महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली आहे. त्या बाबतची तक्रार मुलीच्या वडिलांनी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. मागील महिन्यात मुलीच्या पालकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यातील काही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच, घटनेत वापरलेली गाडीही ताब्यात घेतली. मात्र, अद्यापही बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने नगर तालुका पोलिसांचा निषेध करत मुलीच्या आईने पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

 पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक सुरू असतानाच, हा प्रकार घडल्याने अधिकाऱयांची चांगलीच तारांबळ उडाली. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी सदर महिलेला ताब्यात घेतले.

 दरम्यान, दोन वर्षांत पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याची ही चौथी घटना आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चार दिवसांतच एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.