वेदनांनी पोखरलेल्या बालिकेचा आईनेच घोटला गळा ! आईनेही संपवले जीवन; वारजे येथील घटना

जन्मापासून अस्थिविकाराने ग्रस्त असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या वेदना आणि त्या पाहत जगणाऱ्या आईची असहायता अखेर एका हृदयद्रावक शेवटाकडे पोहोचली. वारजे माळवाडी परिसरात आईने आपल्या लेकीचा गळा आवळून जीव घेतल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

या दुर्दैवी घटनेत शारवी आदिनाथ देवडकर (2) आणि तिची आई छाया आदिनाथ देवडकर (28) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शारवीचे वडील आदिनाथ संताराम देवडकर (वय 30, रा. गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांनी वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवडकर कुटुंब मूळचे बीड जिल्ह्यातील असून, गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होते. आदिनाथ देवडकर इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात, तर छाया या गृहिणी होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी शारवी हिला जन्मतःच हाडांचा आजार होता. तिच्यावर उपचार सुरू असले, तरी आजार सहज बरा होणार नसल्याचे समजल्याने आई छाया दिवसेंदिवस मानसिक तणावात सापडत गेली होती. शुक्रवारी दुपारी आदिनाथ कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास ते परतले तेव्हा पाळण्यात शारवी निपचित पडलेली होती. तिचे हात-पाय चिकटपट्टीने बांधलेले होते. त्याच वेळी घरातच छायाने गळफास घेतल्याचे दिसून आले. घाबरलेल्या अवस्थेत आदिनाथ यांनी पोलिसांना माहिती दिली.

वारजे माळवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आई आणि लेकीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात शारवीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

लेकीच्या वेदनांनी कोलमडलेली आई

शारवीला अस्थिविकारामुळे सतत तीव्र वेदना होत होत्या. तिच्या रडण्याने आणि असह्य यातनांनी आई छाया आतून कोलमडून गेली होती. या असहायतेतूनच तिने पाळण्याच्या दोरीने मुलीचा गळा आवळून प्राण घेतला आणि त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवले, अशी माहिती वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी दिली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.