
सामना ऑनलाईन । अलिबाग
म्हसळा शहरात कावीळ, जुलाब, सर्दी, खोकला या रोगांनी डोके वर काढलेले असताना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत उंदीर आणि वटवाघळांच्या लेंडय़ा आढळल्या आहेत. त्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांची साथ शहरात पसरते की काय, अशी घबराट नागरिकांची उडाली आहे.
म्हसळा शहराला भापट येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. या बंधाऱ्यातून उचललेले पाणी आदिवासी वाडीमध्ये बांधलेल्या टाकीत साठविले जाते. त्यानंतर त्याचा पुरवठा शहराला केला जातो. या टाकीची आवश्यक ती देखभाल नगरपंचायतीकडून केली जात नाही. टाकीचे झाकण उघडेच असते. ही टाकी जंगलात असल्याने तिथे पक्ष्यांचा मोठा वावर आहे. अनेक वेळा पाण्याच्या टाकीत मृत पक्षी आढळून आले आहेत. टाकीच्या परिसरात उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट वाढला असून पंप हाऊसमध्ये त्यांच्या लेंड्याचा थर लागला आहे. या पंप हाऊसमध्ये असलेल्या भगदाडातून या लेंडय़ा टाकीत पडत आहेत.
नगरपंचायतीवर गुन्हा दाखल करा!
उंदीर आणि वटवाघळाच्या लेंडय़ामिश्रित पाणी शहरातील नागरिकांना पिण्यास भाग जबाबदार असलेल्या नगरपंचायतीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुडेकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी केली आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

























































