माऊथवॉशने गुळण्या केल्यास कोरोना विषाणू नष्ट होतो! अमेरिकेतील संशोधकांच्या अभ्यासातील निष्कर्ष

mouthwash

दररोज माऊथवॉशने गुळण्या केल्याने मानवी शरीरातील कोरोना विषाणू नष्ट होतो, असा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. काही जंतूनाशके (ओरल) आणि माऊशवॉशने गुळण्या केल्यास घशातील व तोंडातील संसर्गाचे विषाणू निष्क्रीय बनतात. त्यांना निष्क्रीय करण्याची क्षमता मानवी शरीरात तयार होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. हा घरगुती उपाय कोरोनाविरोधातील लढय़ात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पेन स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी अभ्यासाअंती काढलेले निष्कर्ष मेडिकल वायरोलॉजीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध केले आहेत. ज्यावेळी आपण कोरोनाची लस विकसित होण्याची वाट पाहतोय, त्याचवेळी कोरोनाचा फैलाव कमी करण्याच्या उपायांची आवश्यकता भासतेय. ज्या उत्पादनांचे आम्ही परीक्षण केले आहे, ती उत्पादने सहज उपलब्ध होणारी आहेत. किंबहुना रोजच्या दिनचर्येचा भाग आहेत, असे संशोधकांच्या पथकाचे नेतृत्व करणारे प्रा. क्रेग मेयर्स यांनी सांगितले. अभ्यासादरम्यान संशोधकांच्या पथकाने कोरोना विषाणू निष्क्रीय करण्यासाठी एक प्रयोग केला. यावेळी प्रयोगशाळेत काही ओरल आणि नासॉफिरिन्जियल माऊथवॉशचे परीक्षण करण्यात आले. प्रयोगात बेबी शाम्पू, विविध प्रकारचे पेरोक्साइड जंतूनाशके तसेच माऊथवॉशच्या विविध ब्रॅण्ड्सचा वापर करण्यात आला.

याआधी जर्मनीच्या संशोधकांनीही माऊथवॉशने गुळण्या केल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होत असल्याचा निष्कर्ष काढला होता. कोरोनाच्या काही रुग्णांच्या घसा आणि तोंडात विषाणूचे अधिक प्रमाण आढळते. अशा रुग्णांसाठी हा उपाय अधिक परिणामकारक असल्याचे संशोधकांनी म्हटले होते. त्याच धर्तीवर अमेरिकेतील संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या