
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या, नाहीतर उडवून टाकू, अशी धमकी गोंदियाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, आम्हीच तुम्हाला उडवून देऊ, असे पडोळे यांनी मोदी-फडणवीसांना उद्देशून म्हटले आहे.
‘भंडारा आणि गोंदिया जिह्याला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढल्यानंतर धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील धानाला कोंब फुटले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरीविषयक धोरण तातडीने बदलायला पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्यावी. शेतकऱ्यांना पीक विम्याचे फक्त 18 रुपये मिळतात, ही शोकांतिका आहे. 18 रुपयांत शेतकरी काय करणार, त्याला दिलासा कसा मिळणार’, असा सवाल खासदार प्रशांत पडोळे यांनी सत्ताधाऱ्यांना केला.
विरोधी पक्षांचे नेते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत मागत असताना खासदार पडोळे यांनी त्याच्यापेक्षा दुपटीने मदतीची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बरोबरच त्यांच्या धमकीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपने पडोळे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनपुळे म्हणाले.




























































