…तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळय़ा वाजवाव्या लागतील!

सामना ऑनलाईन, भोपाळ

जर गुरूंच्या समोर टाळय़ा वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळय़ा वाजवाव्या लागतील, असे बेताल विधान मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री कुंवर विजय शाह यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केल्याने खळबळ उडाली आहे.

देशभरात आज शिक्षक दिन साजरा होत असताना शाह यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यामुळे देशभरात वाद होण्याची चिन्हे आहेत. मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री कुवर विजय शाह शिक्षक दिनानिमित्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, पहा गुरूच्या सन्मानासाठी आमचे सहकारी टाळय़ा वाजवत नाहीत तर टाळय़ा वाजवण्याचे फक्त नाटक करीत आहेत. गुरू हा ईश्वरापेक्षा मोठा असतो. जर गुरूच्या सन्मानार्थ आपण टाळय़ा वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळय़ा वाजवण्याची नामुष्की आपल्यावर ओढवेल. शाह यांच्या या वक्त्यव्याने मध्य प्रदेशसह देशभरात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.