दहशतवादविरोधात लढा! 33 देशांचा दौरा केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मोदींनी घेतली भेट

दहशतवादाविरोधातील हिंदुस्थानची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी 33 देशांच्या दौऱयावर गेलेल्या सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या सदस्यांची मंगळवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. ही शिष्टमंडळे ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर विदेश दौऱयावर गेली होती. त्यांनी दौऱयात हिंदुस्थानची बाजू प्रभावीपणे मांडल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.

पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी शिष्टमंडळांच्या सदस्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत जेवण केले. शिष्टमंडळांच्या 59 सदस्यांनी 33 देशांना भेट दिली. सदस्यांमध्ये 51 नेते आणि आठ राजदूतांचा समावेश होता. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारी दोन पुस्तके भेट दिली. शिष्टमंडळांमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, जेडीयूचे संजय कुमार झा, डीएमकेच्या कनिमोझी करुणानिधी आदी नेते सहभागी झाले होते. त्यांनी दहशतवादाविरोधातील हिंदुस्थानची भूमिका जगापुढे मांडताना आलेले विविध अनुभव पंतप्रधान मोदी यांच्यासोबत शेअर केले.