श्रीगोंदा एमआयडीसीची घोषणा म्हणजे विखेंचा चुनावी जुमला, घनःशाम शेलार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या खासदारकीच्या साडेचार वर्षांच्या काळात श्रीगोंदा एमआयडीसी व साकळाई योजनेची आठवण झालेली नव्हती. मात्र, लोकसभेच्या निवडणुकांसमोर आल्यानंतर ‘साकळाई उपसा सिंचन योजने’चे सर्वेक्षण व एमआयडीसीला तत्त्वतः मंजुरी अशा फसव्या घोषणा हा विखे पिता-पुत्रांचा चुनावी जुमला आहे, असा घणाघाती आरोप घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.

प्रसिद्धिपत्रकात म्हटले, 2019 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. सुजय विखे यांना खासदार करा, मी ‘साकळाई योजने’चे पाणी श्रीगोंदा व नगर तालुक्याला देईन, अशी घोषणा केली होती. विखे खासदार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सहा महिने मुख्यमंत्री होते, तर राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेटमंत्री होते. पण सुजय विखे खासदार झाल्यानंतर त्यांना आपण केलेल्या घोषणांचा विसर पडला. गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी श्रीगोंदा एमआयडीसी आणि ‘साकळाई पाणी योजने’बद्दल काहीही केले नाही. त्यामुळे विखे पिता—पुत्रांनी नवीन नौटंकी सुरू करून पुन्हा दिशाभूल आणि धूळफेक करत श्रीगोंदा एमआयडीसीला तत्त्वतः मंजुरी अशा प्रकारची फसवी घोषणा केली आह़े त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या फसव्या घोषणांना जनता फसणार नसून, अत्यंत निक्रीय खासदाराला आगामी निवडणुकीत लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा घणाघाती आरोप शेलार यांनी केला.