सांसद आदर्श शिवापूर गावातील कामात अधिकाऱ्यांची हयगय करणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

केंद्र सरकारच्या सांसद आदर्श दत्तक ग्राम या महत्त्वाकांक्षी योजनेत माणगांव खोऱ्यातील शिवापुर हे गाव घेण्यात आले आहे. देशात असलेल्या ५४३ सांसद आदर्श गावांमधून शिवापूरचे नाव देशात पहील्या २० गावांमध्ये यावे यासाठी येथील ग्रामस्थ व अधिकारीवर्गाचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे येथील विकास कामे वेळेत पूर्ण व्हावीत. सांसद आदर्श गाव बनविण्याच्या या विकास प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी हयगय केल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला.

शिवापुर (ता.कुडाळ) ग्रा.पं.मध्ये सांसद आदर्श दत्तक गाव योजनेची आढावा बैठक बुधवारी खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कुडाळचे सभापती राजन जाधव, उपसभापती सौ. श्रेया परब, सरपंच यशवंत कदम, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, गटनेते नागेंद्र परब, जि.प.सदस्य संजय पडते, सौ.अनुप्रती खोचरे, राजु कविटकर, शिवसेना महीला आघाडी प्रमुख सौ. जान्हवी सावंत, जि.प. बांधकाम उपअभियंता जे.डी.कांबळे, ग्रामीण पाणी पुरवठाचे अभियंता श्रीपाद पाताडे, सा.बां. उपअभियंता सौ. अनामिका जाधव, गटशिक्षणाधिकारी सुर्यभान गोडे, ल.पा.विभागाचे उपअभियंता विवेक नानल, पशुविभागाचे डॉ.मुळीक आदींसह विविध विभागांचे खातेप्रमुख अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

खा.राऊत यांनी सर्व विभागांकडून कामांचा आढावा घेतला. त्यांतर बोलताना खा. राऊत म्हणाले, पर्यटनाच्या माध्यमातुन या गावाला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी व पर्यटनातुन या गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या शिवापुर गावाची निवड केंद्र सरकारच्या सांसद आदर्श दत्तक गाव योजनेत करण्यात आली आहे. या गावाचा विकास होत असतानाच या पंचक्रोशीतील गावाचाही विकास होणार आहे. त्यामुळे तेथील विकास कामे पूर्ण होणे गरजेची आहेत. येथील कामे अधिकाऱ्यांनी पूर्ण करून घ्यावीत या कामात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा खा.राऊत यांनी यावेळी दिला.

सायन्स सिटीमध्ये चार विद्यार्थ्यांना संधी
लखनऊ येथे सायन्स सिटी या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी शिवापुर येथील पहीली ते आठवी पर्यंतच्या चार मुलांना पाठविण्यात येणार आहे. राज्यातील गावातुन निवडलेल्या १० गावांमध्ये शिवापुरची निवड करण्यात आली असुन सरपंचांनी या बाबत गावात चर्चा करून चार विद्यार्थ्यांची नावे निश्चित करावीत. या सर्वांचा खर्च केंद्र सरकार करेल, असे खा. राऊत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ग्रामस्थांनी या गावातील ग्रामसेवक, तलाठी, पशुधन अधिकारी, वायरमन ही पदे गेली कित्येक महीने रिक्त आहेत. तसेच काही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार खा. राऊत यांच्याकडे केली. या तक्रारींची दखल घेत खा.राऊत यांनी या गावातील रिक्त असलेल्या पदांवर तात्काळ अधिकारी – कर्मचारी नियुक्त करावेत असे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिका-यांना दिले. जि. प. सदस्य पडते यांनी मार्गदर्शन केले तर गटविकास अधिकारी चव्हाण यांनी योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.