
धाराशिव जिल्ह्यातील चार तालुक्याचे कोविड केअर सेंटर कळंबमध्ये आहे. चार तालुक्यात ते एकमेव सेंटर असून पॉझिटिव्ह रुग्ण व हायरिस्क रुग्ण यांना एकत्र ठेवण्यात येते. तसेच या ठिकाणी सोयीसुविधा नसल्याच्या तक्रारी आल्याने शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी येथील कोविड सेंटरला अचानक भेट दिली. थेट रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसेच यापुढे पॉझिटिव्ह रुग्ण व हायरिस्क रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, तसेच रूग्णांना सोईसुविधा पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनाचा विळखा वाढत चालला असून कळंब येथील कोविड सेंटरमध्ये वाशी, भूम, परंडा येथील पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सध्या कळंब शहर हॉटस्पॉट ठरत आहे. तांदूळवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे पॉझिटिव्ह रुग्ण व हायरिस्क रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. तर शहरातील विद्याभवन हायस्कूल शाळेच्या परिसरात असणाऱ्या मुलींच्या वसतीगृहामध्ये बाहेरील जिल्ह्यातून आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी शासनाच्या वतीने विविध सुविधा देण्यात येत आहेत. मागील काही दिवसापासून मुलींच्या वसतिगृहातील क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांना मुलभूत सुविधा व जेवण व्यवस्थित मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेचे गटनेते तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, नगरसेवक सतिश टोणगे यांनी केल्या होत्या. रुग्णांना पाणी नाही, निकृष्ट दर्जाचे जेवण तसेच स्वच्छतेचा अभाव यामुळे रूग्णांना त्रास सहन करावा लागत होता.
याबाबतच्या तक्रारी खासदार, आमदार यांच्यापर्यंत पोहचल्या होत्या. त्यामुळे अचानक रविवारी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे – पाटील, धाराशिवचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी कोविड सेंटरला भेट देऊन सर्वांना धक्का दिला. येथे क्वॉरंटाईन करण्यात आलेल्यांसोबत चर्चा केली. यावेळी अनेकांनी जेवण व्यवस्थित नाही, स्वच्छतागृहाची स्वच्छता नाही यासह अनेक समस्या असल्याचे सांगितले. यावेळी खासदार व आमदारांनी संबंधित प्रशासनाला यापुढे अशी तक्रार येऊ नये, यांच्या समस्या तात्काळ सोडवा, अशी सूचना दिली. यावेळी तहसीलदार अस्लम जमादार, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप जाधव, नगरसेवक सतीश टोणगे, युवासेना संपर्कप्रमुख नितीन लांडगे, शहरप्रमुख प्रदीप मेटे, अजित गुरव उपस्थित होते.
तांदूळवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सुध्दा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे – पाटील, मकरंद राजेनिंबाळकर यांनी अचानक भेट दिली. यावेळी अनेकांशी संवाद साधला असून या ठिकाणी काही मुलभूत सुविधाचा अभाव असल्यामुळे या सुविधा पुरविण्यात याव्यात अशी सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटिल यांनी अधिकाऱ्यांना केली.
























































