
पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाची तयारी करणाऱया उमेदवारांना शारीरिक चाचणीत 60 गुण मिळविणे आवश्यक आहे. पीएसआय निवडीसाठी एमपीएससीच्या वतीने (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) घेण्यात येणाऱया मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना या पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुणांची अट ठेवण्यात आली आहे. एमपीएससीने यासंदर्भात मंगळवारी नव्या निर्णयाची अधिसूचना जारी केली आहे.
शारीरिक चाचणीच्या निकालाच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीसाठी बोलवण्यात येते. मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱया उमेदवारांची मुलाखत आयोगाच्या कार्यक्रमानुसार तसेच आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेस घेण्यात येते. शारीरिक चाचणी व मुलाखत एकाच दिवशी घेण्यात येते. शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरच आता विद्यार्थ्यांना मुलाखत देता येणार आहे. एपीएससीच्या 2020 मध्ये निघालेल्या जाहिरातीसाठी हा नियम लागू असणार आहे.
- यापूर्वी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत.
- हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यापूर्वी मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 गुण मिळविणे आवश्यक होते.





























































