
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप सेमी फायनल लढतीत पराभव स्वीकारला लागल्यापासून या चर्चेला वेग आला आहे. परंतु धोनीने अद्याप याबाबत अवाक्षरही काढले नसून विंडीज दौऱ्यावर जाण्याऐवजी दोन महिने सीमेवर देशसेवा करण्यासाठी सुट्टी घेतली आहे. या सुट्टीनंतर परत आल्यावर तो काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. परंतु तत्पूर्वी धोनीच्या जर्सीला औपचारिकरित्या निवृत्त करण्यात येणार आहे.
सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर त्याची 10 नंबरची जर्सी निवृत्त करण्यात आली. त्याचप्रमाणे धोनीची 7 नंबरची जर्सी निवृत्त होणार आहे. धोनी सध्या एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळत आहे, परंतु त्याने यापूर्वीच कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती. आता कसोटीतही जर्सीवर नंबर दिसणार असल्यानं 7 ची नंबरची धोनीची जर्सी कोणाला मिळेल, याची उत्कंठा वाढली होती. पण, बीसीसीआयनने धोनीची 7 नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
कसोटी मालिकेत संघातील सर्वच खेळाडू मर्यादित षटकांच्या सामन्यात वापरणारा नंबरच जर्सीवर कायम ठेवणार आहेत, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. ‘संघातील अनेक खेळाडू एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये ज्या नंबरची जर्सी परिधान करतात तोच नंबर कसोटीतही कायम ठेवणार आहेत. धोनीच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये 7 नंबरच्या जर्सीचा पर्यायही उपलब्ध आहे, परंतु कोणीही तो नंबर परिधान करेल, याची शक्यता फार कमीच आहे. 7 नंबर म्हणजे एमएस धोनी हे लोकांच्या मनात कोरले गेले आहे, असे बीसीआयने स्पष्ट केले.



























































