
गुडघेदुखी असतानाही चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामन्यात खेळला आणि त्याने कल्पक नेतृत्वाच्या जोरावर आपल्या संघाला पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपदही जिंकून दिले. आता त्याने पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलपर्यंत स्वतःला फिट करण्यासाठी दुखऱ्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि गुरुवारी सकाळी त्याच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रियाही पार पडली. आयपीएल जिंकताच धोनीने स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक्स तज्ञ डॉ. दिनशॉ पारदीवाला यांच्याशी संपर्क साधला आणि गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. पारदीवाला यांनी ऋषभ पंत आणि नीरज चोप्रा यांच्यावरही शस्त्रक्रिया केली आहे.
आयपीएलदरम्यान अनेक सामन्यांत धोनीची गुडघेदुखी उफाळून आली होती. अनेकदा त्याला लंगडत लंगडत चालतानाही पाहिले गेले होते. तरीही धोनी गुडघ्यावर एक विशिष्ट पट्टी लावून आणि वेदनाशामक गोळय़ा घेत अनेक सामन्यात खेळला होता. तसेच ही त्याची शेवटची आयपीएल असावी असा अंदाज बांधला जात होता. त्याने द्दु तसे संकेत दिले होते. पण आयपीएलचे जेतेपद पटकावताच धोनीने आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक आयपीएल खेळणार असल्याचे सांगितले आणि त्यासाठी आपला फिटनेसही राखायला हवा म्हणून त्याने स्पर्धा संपताच आपल्या गुडघ्याच्या दुखण्यावर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
सीएसकेच्या सीईओंनी दिली माहिती
धोनीच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिली. धोनीने मुंबईत जाण्याआधी सीएसकेच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि फ्रेंचाइजीनेही संघाचे फिजिशियन मधू थोट्टाप्पिली यांनी धोनीसोबत पाठवले होते. दोघे बुधवारीच मुंबईला पोहोचले आणि आज सकाळी धोनीच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
धोनी खेळणार पुढच्या आयपीएलमध्ये?
धोनी पुढच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेईल, असा प्रश्न विचारताच सीएसकेचे सीईओ विश्वनाथन म्हणाले, आम्ही अजून त्याबाबत जराही विचार केलेला नाही. हा निर्णय धोनीचा असेल.
म्हणून धोनी कमी धावत होता…
धोनीच्या डाव्या गुडघ्याचे दुखणे अनेकदा बळावले होते. ते दुखणे थोडेसे शमावे म्हणून धोनी फारसा धावत नव्हता. फलंदाजीलाही तो फार उशिरा यायचा आणि फलंदाजी करताना एकेरी-दुहेरी धावा न काढता चौकार-षटकार ठोकण्याचा प्रयत्न करायचा. त्याने फलंदाजी करताना मला धावायला लावू नकोस असा सल्ला आपल्या जोडीदाराला देताना पाहिले गेले आहे.


























































