
हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीबाबत मोठे विधान केले आहे. ‘इंडिया टुडे’शी बोलताना गांगुलीने प्रत्येक खेळाडूला एक ना एक दिवस निवृत्त व्हावे लागते असे म्हटले.
गांगुली म्हणाला, प्रत्येक मोठ्या खेळाडूला एक ना एक दिवस आपले बूटं खुंटीला टांगावी लागतात (निवृत्त व्हावं लागतं). हाच नियम आहे, खेळ आहे. फुटबॉलकडे पाहा… माराडोनाला निवृत्त व्हावं लागलंच ना. फुटबॉलमध्ये त्याच्यापेक्षा मोठा खेळाडू नाही. क्रिकेटमध्ये तेंडुलकर, लारा, ब्रॅडमन… या सर्वांनाच एक दिवस क्रिकेटला रामराम करावा लागला. हाच नियम आहे, होता आणि राहिल. ही स्थिती एमएस धोनीसाठीही येणार आहे, असे दादा म्हणाला.
तो पुढे म्हणाला, तो सध्या कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर आहे जिथून तो स्वत:चे मुल्यमापण करू शकतो. त्याला हे ठरवायचे आहे की आपण अजूनही हिंदुस्थानला सामना जिंकून देऊ शकतो का? तो एखाद्या खेळाडूप्रमाणे नाही तर एमएस धोनीप्रमाणे संघाला योगदान अजूनही देऊ शकत का? कारण धोनी, विराट, सचिन सारखे खेळाडू जोपर्यंत खेळत असतात तोपर्यंत त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची, प्रत्येक सामना जिंकून देण्याची अपेक्षा असते. माझ्यामते आता धोनीला निर्णय घ्यायला हवा. एका खेळाडूला माहिती असते आपल्यात किती क्रिकेट बाकी आहे आणि किती मॅचविनिंग क्षमता, असे म्हणत गांगुलीने धोनीला एकप्रकारे उल्लेख न करता निवृत्तीचा निर्णय घेण्याचा इशाराच दिला.

























































