
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असताना ‘धडकी’ भरवणारा म्युकर मायकोसिसही आता आटोक्यात येत आहे. मुंबईतील पालिकेच्या चार आणि खासगी रुग्णालयांत मिळून सध्या 414 सक्रिय रुग्ण आहेत. आठवडाभरापूर्वी पाचशेकडे गेलेली रुग्णसंख्या आता कमी झाली आहे. सध्याच्या रुग्णांमध्ये केवळ 125 रुग्ण मुंबईतील असून इतर रुग्ण मुंबईबाहेरील असून उपचारासाठी या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे मुंबईतील म्युकर मायकोसिसच्या वाढीचे प्रमाण घटले असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट पूर्ण नियंत्रणात येत असतानाच कोरोनानंतर होणार्या म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढू लागल्याने पालिकेचे आव्हान वाढले होते. डोळे, नाक आणि मेंदूवर हल्ला करणार्या बुरशीजन्य आजारामुळे जिवालाही धोका निर्माण होतो. कोरोना उपचारात अतिप्रमाणात घेतलेली स्टिरॉइड, टोसिलॅझुमॅबचा अतिवापरामुळे हा आजार होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
मात्र सद्यस्थितीत मुंबईत म्युकर मायकोसिस रुणांची संख्या घटत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या आजारामुळे मुंबईत आतापर्यंत 88 मृत्यू झाले असले तरी यात मुंबईत रुग्णांची संख्या 29 आहे. एकूण मृतांमधील पालिकेच्या रुग्णालयात 66 जणांचा मृत्यू झाला असून खासगी रुग्णालयात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पालिकेच्या रुग्णालयांत 20 मृत्यू झाले असून खासगी रुग्णालयांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेची ‘दक्षता’ प्रभावी ठरतेय!
म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळू लागल्यानंतर पालिकेने ‘टास्क फोर्स’ने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उभी केलेली यंत्रणा उपयुक्त ठरत आहे. म्युकर मायकोसिस रुग्णांवर पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयासह खासगी रुग्णालयांतही उपचार सुरू आहेत. या आजारावर प्रभावी असणारे इंजेक्शन एम्फोटेरेसिन-बी लॅपोझोम आणि टॅबलेट पोसोकोनेझोल वापरले जात आहेत.
‘कोअर कमिटी’च्या नियंत्रणाखाली खासगी रुग्णालयांनाही पालिकेकडून शुल्क आकारून औषधे पुरवली जात आहेत. नाक आणि डोळ्यांवर ऑपरेशन करून इन्फेक्शन काढून टाकण्यात येत आहे. आतापर्यंतच्या 50 टक्के रुग्णांवर अशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या आजारातून पूर्ण बरे होण्यासाठी सुमारे चार ते सहा आठवडे लागतात, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
म्युकर मायकोसिसची लागण झाल्यास डोळे चुरचुरणे-दुखणे, लाल होणे, स्राव येणे, दृष्टी कमी होणे, नाकातून दुर्गंधी येणारा स्राव येणे, नाक दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाकातून बुरशीजन्य दुर्गंधीयुक्त काळा स्राव येणे, डोके दुखणे अशा लक्षणांनंतर म्युकर मायकोसिचा विषाणू मेंदूवरही आघात करतो. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने कान, नाक, डोळे, मेंदूचा डॉक्टर किंवा जवळच्या डॉक्टरकडे संपर्क साधावा असे आवाहन पालिकेने केले आहे.


























































