प्रेरणा; कश्मीरचा ‘बिंदास’ पोलीस कमांडो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>कर्नल अभय बा. पटवर्धन (निवृत्त)

‘शहादत (हौतात्म्य) आमच्या जीवनाचे अभिन्न अंग आहे’ या बाण्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठेचून काढणारे जम्मू-कश्मीरचे पोलीस दल आणि हिंदुस्थानी लष्कराच्या जाँबाज कमांडो सैनिकांना त्रिवार नमन. याच चकमकीत कश्मीर पोलीस खात्यातील ‘बिंदास’ कमांडो मुदस्सीर अहमद शेख यांनाही वीरमरण आले. देश आणि कर्तव्यपूर्तीसाठी आपले आयुष्य ओवाळून टाकलेल्या या खुंखार कमांडोविषयी…

कश्मीर सीमेपलीकडून 25 मे 2022 रोजी आलेल्या जिहादी घुसखोरांबरोबर झालेल्या चकमकीत बारामुल्ला पोलीस ठाण्यातील पोलीस कमांडो मुदस्सीर अहमद शेख यांना वीरमरण प्राप्त झाले. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे (जेईएम) तीन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. 37 वर्षीय मुदस्सीर अहमद शेख हे ‘बिंदास’ या टोपण नावाने पोलीस दल, लष्कर तसेच राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांमध्ये परिचीत होते. सैन्याच्या बारामुल्ला क्षेत्रातील जवळपास सर्वच चकमकींत सामील पोलीस पथकांमध्ये मुदस्सीर नाहीत, असे कधीही झाले नाही.

असे म्हणतात की, घुसखोरी आणि दहशतवादविरोधी (काऊंटर इंफिल्टरेशन/टेररिझम) कारवायांमध्ये काम केलेल्या लष्कराच्या जवळपास सर्वच जवानांकडे त्यांचा मोबाईल नंबर ‘बिंदास’ नावानेच सेव्ह केलेला होता. कश्मीरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात तयार झालेला खुंखार आणि बिनधास्त स्वभाव, आर्मी कमांडो स्कूलमधील उत्तम कामगिरी आणि सामरिक चकमकींमध्ये दर्शवलेले विलक्षण धाडस यामुळे मुदस्सीर यांना हे टोपण नाव मिळाले होते. मुदस्सीर बहुतांश वेळी लिखित प्रशिक्षण प्रणालीच्या बाहेर जाऊन (बियॉण्ड ट्रेनिंग मॅन्युअल/करिक्युलम) कारवाई करायचे. कितीही दीर्घ सामरिक कारवाईत भाग घ्यावा लागला तरी दिवस अखेर किंवा रात्रीसुद्धा मुदस्सीर व्यायामशाळेतच घाम गाळताना दिसतील, हे सर्वांनाच माहीत होतं. आपण नेहमीच कमांडोसारखे फिट असायला हवे ही त्याची उत्कट भावनाच या वर्कआऊटमागे होती.

पोलीस प्रशिक्षण केंद्रातून बाहेर आल्यावर तिसऱया वर्षीच मुदस्सीर यांची निवड कश्मीर पोलिसांच्या ‘अँटी इमर्जन्सी टास्क फोर्स’मध्ये काम करण्यासाठी झाली. सात-आठ वर्षे ते या फोर्समध्ये होते. दहशतवादी असलेले कुठलेही जंगल, घर किंवा इतरत्र दाखल होण्यासाठी सर्वात प्रथम मुदस्सीर सदैव तयार असायचे. कट्टर धर्मांध जिहाद्यांशी होणाऱया सामरिक संपर्कासाठी मुदस्सीर नेहमीच ‘फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट’ असायचे. कुठल्याही चकमकीत पहिली गोळी मुदस्सीर झेलत असे. असंख्य कश्मिरी नागरिकांचे प्राण वाचवणाऱया आणि दहशतवाद्यांचा कर्दनकाळ असलेल्या सैन्य व पोलिसांच्या ऍण्टी टेरर टीम्सचा ते अभिन्न हिस्सा होते.

बिंदास मुदस्सीर प्रत्येक ऑपरेशनमध्ये बुलेटप्रूफ जॅकेटवर शिकारी सुरा, हाती एके-47 रायफल आणि खिशात पाच-सहा भरलेली रायफल मॅगझिन्स न्यायचे. हॅण्ड ग्रेनेड नेण्याबाबत ते उदासीन असायचे. हॅण्ड ग्रेनेड खिडकी/दरवाज्यातून आत फेकावे लागते आणि हे करताना आपण कोणावर टाकतो हे दिसत नाही असे त्यांना वाटत असे आणि ते खरेही आहे. त्याच्याबरोबर अनेक चकमकींमध्ये सहभागी झालेल्या साथीदारांनुसार मुदस्सीर नेहमी आपल्या एके-47 ने आग ओकत दरवाज्यातून धडधडत आत जाऊन दहशतवाद्यांवर डायरेक्ट फायर करायचे. ऑगस्ट 2019 मध्ये निष्पाप नागरिकांच्या सुटकेसाठी बारामुल्लामध्ये झालेल्या एका ऑपरेशनमध्ये त्यांचे भाऊ स्पेशल पोलीस ऑफिसर बिलाल अहमद मारले गेले. शौर्यचक्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तेव्हापासून मुदस्सीर उदास असायचे. अर्थात “जितनी जिंदगी है, उतनीही होनी है; ना कम, ना जादा’’ हे मुदस्सीरचे ब्रीदवाक्य होते.

सैन्याच्या कश्मीरमधील कारवायांबद्दल बरीच माहिती मिळत असते, पण त्या राज्यातील पोलिसांमध्ये मुदस्सीरसारखे हिरे सापडतात तेंव्हा त्यांची नोंद घेणे क्रमप्राप्त असते. मुदस्सीरला शौर्य पुरस्कार मिळेल किंवा मिळणारही नाही, पण मुदस्सीरसारख्या वीरांची दखल घेणे आवश्यक आहे आणि मी तोच प्रांजळ प्रयत्न केला आहे.
‘टेकिंग ए बुलेट इन युवर चेस्ट इज द मोस्ट ग्लोरियस वे फॉर ए सोल्जर टू गो’ असे आम्ही नेहमीच म्हणतो. केवळ बिंदास, दबंग शूरवीरांच्या भाग्यातच हौतात्म्य असते. स्वर्गाच्या सुरक्षेसाठी देवालाही असेच वीर हवे असतात. ज्यांनी त्याच्याबरोबर ऑपरेशन्स केले आहेत त्यांच्यासाठी ‘मुदस्सीर शेख ‘बिंदास’ होते आणि सदैव बिंदासच राहतील.’ त्यांच्यासाठी मुदस्सीरची शहादत सदैव वंदनीयच असेल. नेशन सॅल्यूटस सच दबंग, बिंदास सोल्जर्स, दे बी फ्रॉम आर्मी ऑर पोलीस इज इंमटेरियल!

देखणे मुदस्सीर पाच फूट नऊ इंच उंच, बांका, गब्रू जवान होते. मुदस्सीरची लोकप्रियता दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय असलेल्या मृत बुरहान वनीसारखी, किंबहुना जास्तच होती. एखाद्या मूव्ही हीरोसारखा देखण्या मुदस्सीरबरोबर सेल्फी काढण्याची चढाओढ लोकांमध्ये दिसून येत असे. “तू पोलिसांची नोकरी सोडून आर्मी, राष्ट्रीय रायफल्स किंवा एनएसजी का जॉईन करत नाहीस?’’ अशी विचारणा अनेक सेनाधिकाऱयांनी मुदस्सीर यांना केली होती, पण त्यांना कश्मीर पोलिसातच काम करायचे होते. जिहादी दहशतवाद्यांचा खात्मा करणे त्याचे ध्येय होते. मुदस्सीर यांना पोलीस दलातील स्पेशल कमांडो म्हणून कश्मीरमध्येच राहून दहशतवाद्यांशी लढायचे होते. ‘‘मी यासाठीच तर पोलीसमध्ये भरती झालो आहे. मला कुठल्याही पोझिशन, पॉवर किंवा खुर्चीचा लोभ नाही. मला माझा पोलीस युनिफॉर्म, बुट्स, एके-47 आणि मोबाईल जान से प्यारे आहेत. मला जिहादी दहशतवाद्यांशीच लढायचे आहे’’ असे ते नेहमी आपली फेमस स्माईल देत म्हणत असत.

मे 2022 च्या चौथ्या आठवडय़ात लष्करासह ऑपरेशन करत असताना ‘बिंदास’ मुदस्सीर पैगंबरवासी झाले. श्रीनगर गुलमर्ग राज्य मार्गावर बारामुल्ला भागातील नजीभट क्रॉसिंगवर असलेल्या क्रिरी चेकपोस्टवर ही चकमक झाली. या चेकपोस्टवर सैन्य आणि पोलीसचे जवान तैनात होते. वेगाने येणाऱया एका संशयास्पद गाडीला थांबण्यासाठी सांगितल्यावर त्यातील जिहाद्यांनी अंदाधुंद फायर सुरू केला. गाडीत चार आतंकवादी होते. त्यांनी गाडीबाहेर येऊन फायरिंग पोझिशन घेतल्या. चेकपोस्टवरील जवानांनी प्रत्युत्तर सुरू केले. ही चकमक जवळपास अडीच तास सुरू होती. या दोन्हींकडून होणाऱया फायरिंगच्या गदारोळात एक जिहादी पळून जाण्यात यशस्वी झाला. हे चवताळलेल्या मुदस्सीरना सहन झाले नाही. पॉइंट ऍक्शनवर असलेल्या निधडय़ा छातीच्या मुदस्सीर यांनी जिवाची पर्वा न करता जिहाद्यांवर सरळ हल्ला केला. त्यांनी जर हे प्राणांतिक धाडसी पाऊल उचलले नसते तर कदाचित फायरिंगच्या आड बाकी जिहादीदेखील निसटण्यात सफल होऊ शकले असते. या चकमकीत जेईएमचे तीन दहशतवादी मारले गेले. या वर्षी गुलमर्ग श्रीनगरला प्रचंड मोठय़ा प्रमाणात पर्यटक आले आहेत. अमरनाथ यात्राही सुरू होणार आहे. सहा एके-47 रायफल्स, अमाप ऍम्युनिशन, बारा चिनी हॅण्ड ग्रेनेड्स आणि नऊ आयईडी हाती असलेले हे दहशतवादी जर पहलगामला पोहोचले असते तर त्यांनी किती पर्यटक आणि किंवा भाविकांचे प्राण घेतले असते याची कल्पनासुद्धा करणे कठीण आहे.
[email protected]