
सामना प्रतिनिधी । पाथरी
पाथरी तालुक्यातील मुदगल येथील सरपंचाच्या मुलाला सोमवारी पाथरी-मुदगल रस्त्यावर पिंपळगाव फाट्या नजिक मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या जवळील रोख चाळीस हजार रुपये आणि सव्वातोळे वजनाची सोन्याची साखळी घेऊन पलायन केले. गंभीर जखमी मुलालार परभणी येथे खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुदगल येथील सरपंच सुमित्राबाई केंद्रे यांचा मोठा मुलगा लक्ष्मण बाबूराव केंद्रे (42) हे काही कामा निमित्त बाळासाहेब घोडके या साथिदारासह कामानिमित्त पाथरीत आले होते.त्यानंतर सायंकाळच्या सुमारास स्वत: गाडी चालवत गावी परत जात होते. याच दरम्यान पिंपळगांव फाट्याजवळ गेले असता अशोक नवले या अट्टल गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने लक्ष्मण यांना काठीने मारहाण केली आणि त्यांच्या जवळील रोख चाळीस हजार आणि गळ्यातील सव्वातोळे वजनाची सोन्याची साखळी असा एकूण 80 हजार रुपयांचा माल काढून घेतला.
या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबधित आरोपी अशोक नवले याच्यावर या पूर्वीही गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.































































